आरटीईच्या प्रवेशासाठी ९,३२६ बालकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:16 PM2020-06-16T23:16:15+5:302020-06-16T23:16:24+5:30
प्रवेशाअभावी चिंता; प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकांची मागणी
- सुरेश लोखंडे
ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ बालकांची पहिली ते केजीच्या वर्गासाठी निवड झाली. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या या बालकांना जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. मात्र, संबंधित शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या या पालकांना सुटीचा बहाणा करून कार्यालयांमध्ये उभेही करीत नसत. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या बालकांचे रखडलेले प्रवेश करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या खासगी, अनुदानित व विनाअनुदानित ६६९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात १२ हजार ९१३ बालकांचे शालेय प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी २0 हजार ६६७ अर्ज आले असता त्यातून या नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीद्वारे निवड झाली आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आदी सर्व प्रवर्गातील निवड झालेल्या या बालकांचे प्रवेश कोरोनाचे संकट आणि शाळांच्या सुटीमुळे रखडले आहेत. परंतु, आता शाळांचे कार्यालयीन कामकाज सुरू असल्यामुळे या बालकांचे प्रवेश सोशल डिस्टन्सद्वारे करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना तर केजीच्या वर्गात एक हजार ३३९ बालकांचे प्रवेश आरटीईखाली निवड झालेल्या संबंधित शाळांमध्ये राखीव आहेत. या १२ हजार ९१३ राखीव जागांवरील प्रवेशासाठी नऊ हजार ३२६ बालकांची निवड झाली आहे. उर्वरित प्रवेश अर्जातील त्रुटी, अपूर्ण अर्ज, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांखाली बहुतांश अर्ज बाद ठरले आहेत. मात्र, पात्र ठरलेले व निवड झाल्याचा मेसेज प्राप्त झालेल्या बालकांचे पालक संबंधित शाळांमध्ये सतत फेºया मारत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे ते द्विधा मन:स्थितीत असल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे.
नवी मुंबईत सर्वाधिक प्रवेश रखडले
आरटीईच्या प्रवेशासाठी नवी मुंबईच्या सर्वाधिक दोन हजार ४५ बालकांची निवड झाली असून ते प्रवेश रखडले आहेत. याखालोखाल ठाणे मनपा २ च्या एक हजार ४७५ तर केडीएमसीच्या एक हजार २0४ बालकांची निवड झाल्याचे व कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा ते नावही पालकांना मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. पण कार्यालये सुरू असतानाही या बालकांचे प्रवेश कोरोनाच्या भीतीमुळे रखडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये अंबरनाथच्या ९८५ बालकांसह कल्याण ग्रामीणचे ९४७, ठाणे १ च्या ८७४ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी १ च्या ७३४, भिवंडी २ चे ३४१, मीरा-भार्इंदरचे १६४, मुरबाडचे ५५, शहापूरचे ३४७ आणि उल्हासनगरच्या १५५ बालकांचे शालेय प्रवेश अद्याप रखडले आहेत.