दुबईतील अंतराळ परिषदेसाठी ठाण्यातील युवकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:56+5:302021-08-01T04:36:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संशोधनाची आवड असणाऱ्या विविध महाविद्यालयांतील ठाण्यातील तीन आणि दिल्लीतील एक अशा चार विद्यार्थ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संशोधनाची आवड असणाऱ्या विविध महाविद्यालयांतील ठाण्यातील तीन आणि दिल्लीतील एक अशा चार विद्यार्थ्यांची दुबईत होणाऱ्या अंतराळ परिषदेसाठी एकमताने निवड झाली आहे.
इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (आयएएफ) या फ्रान्समधील पॅरिसस्थित एका अंतराळ अधिवक्ता गटातर्फे अंतराळ परिषद आयोजित केली आहे. यंदा दुबईमध्ये होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान भारतातील चार विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यात ठाण्यातील अक्षत मोहिते, अभिजित कदम, निशांत राणे आणि दिल्लीतील शिवमकुमार सिंह हे चौघे विद्यार्थी ‘थ्रीडी प्रिंटेड रॉकेट काम्पोनंट आणि एअरजेलचे डिझाइन आणि औष्णिक विश्लेषण’ या विषयावर आपले दोन शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यानंतर त्यांचा लेख औपचारिकरित्या आयएएफद्वारे प्रकाशित केला जाणार आहे.
शिवमकुमार हा स्पेसनोव्हा या कंपनीचा मुख्य संचालक असून ‘जगातील युवकांसाठी अंतराळ संशोधन’ या संकल्पनेचा तो जगभर प्रसार आणि प्रचार या युवकांच्या मदतीने करीत आहे. अक्षत हा ‘नासा’च्या विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. संगीत क्षेत्रात स्वतःचे प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या अनेक वाद्ये निपुण असणाऱ्या अभिजित स्पेसनोव्हा कंपनीचा मुख्य मार्केटिंग अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. स्पेसनोव्हा कंपनीच्या मुख्य आर्थिक संयोजक म्हणून निशांत राणे हा युवक यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहे. आपल्या देशातील युवकांना अधिकाधिक विज्ञानवादी बनवून भारताचे नाव जगात उज्ज्वल करण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्या विभागातर्फे हा उपक्रम राबवला जातो, त्या विभागाला टीम स्पेसनोव्हा असे म्हणतात. अंतराळात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही अंतराळ शिक्षण देणे हे टीम स्पेसनोव्हाचे ध्येय आहे, असे सांगण्यात आले.
-------------