स्वभावरेषा - छंदच नव्हे...सही अन् स्वभावही वेगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:45 IST2019-06-10T23:44:52+5:302019-06-10T23:45:13+5:30
छंद हे पॅशन असले तरी त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात

स्वभावरेषा - छंदच नव्हे...सही अन् स्वभावही वेगळा
सतीश चाफेकर
छांदिष्ट आणि छंदी यात खूपच फरक आहे. परंतु छांदिष्ट माणूस हा प्रत्यक्षात कसा असतो याचा वेध सहज घेता येत नाही. नुकताच नाशिकला छंदोत्सव झाला, त्यात विविध भागातून आलेले अनेक छांदिष्ट लोक होते, सगळेच आपापल्या परीने उत्कृष्ट होते, त्यांच्या स्वाक्षऱ्याही वेगवेगळ्या होत्या.
छंद हे पॅशन असले तरी त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, पेशन्स आणि पैसे. पैसे नसले तरी चालतं, पण पेशन्स लागतोच. सर्वांची नावेही इथे घेता येणार नसली तरी त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती मात्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आधी नाव घेऊ विनायक रानडे यांचे. कारण या माणसाला नियतीने सर्व काही दिले, पण एका क्षणात त्याला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पडले. नीट पाहिले तर त्यांच्या स्वाक्षरीमधील सुरुवात थोडे प्रॉब्लेम दाखवते. एक त्रिकोण दिसतो आणि त्यावरची जी गाठ आहे ती कुठेतरी पुढील आयुष्याशी नातेसंबंध जोडते. या माणसाकडे माणसे जोडण्याची कला जबरदस्त आहे, तितकाच त्यांच्या स्वाक्षरीमध्ये स्पीड आहे. अर्थात तो स्पीड त्यांना तब्येतीसाठी घातक ठरू शकतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यावर ते उघड झाले. प्रॉब्लेम कितीही असले तरी तो माणूस त्यातून बाहेर पडून त्याचे काम निश्चित तडीस नेऊ शकतो. त्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे. स्वाक्षरी खालील दोन ठिपके आत्मविश्वास आणि प्लानिंग दाखवतात. माणसाला यश हवे असते आणि जर यश वेगात असेल, तर त्याचे चांगले तसेच वाईट परिणामही असतात. ते त्या व्यक्तीला सहन करावे लागतात. या स्वाक्षरीत सुरुवात सोडली तर सर्व काही उत्तम आहे, परंतु कामाचा स्पीड मात्र निश्चित संयमित करावा लागेल. कारण मोठं काम पुढे अनेक वर्ष करावयाचे असेल तर प्रकृती सांभाळणे आवश्यक आहे.
एका मनस्वी चित्रकाराची स्वाक्षरी पाहू. या माणसाचा छंद आणि श्रद्धास्थान एकच आहे ते म्हणजे गणपती. ठाण्यातला त्यांचा छोटा बंगला पाहिला, तर त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या गणपतीच्या मूर्ती दिसतात. त्यांनी त्यांच्या नजरेतून जी गणपतीची स्केचेस किंवा पेंटिंग काढली आहेत ती अप्रतिम आहेत. त्यांचा व्यवसायसुद्धा त्याच्याशीच संबंधित आहे. त्यांची स्वाक्षरी बघितली, तेव्हा मी अचंबित झालो. कारण ते स्वाक्षरीमध्येही गणपती काढतात. अर्थात गणपती यांच्या मनाचाच नव्हे तर आयुष्याचाही भाग झालेला आहे. त्यांचे नाव आहे दिलीप वैती. नाशिकला त्यांचेही प्रदर्शन होते. त्यांची वृत्ती अत्यंत सौम्य आहे, कुणालाही ते दुखावत नाहीत. सगळ्यांना सांभाळून घेतात. त्यांच्याही स्वाक्षरीत पहिला त्रिकोण आहे, म्हणजे प्रॉब्लेम आणि त्यातून जिद्दीने केलेली सुटका. तर शेवटचे वाय हे अक्षर थोडेसे खाली आलेले आहे. जे गणपतीच्या सोंडेला स्पर्श करू पाहते, परंतु वर्तुळ म्हणता येणार नाही. त्यांच्या स्वाक्षरीच्या रेषा अत्यंत हलक्या हाताने काढलेल्या जाणवतात. त्या रेषांमधूनच त्यांच्या मनाचा हळूवारपणा जाणवतो.
तिसरी स्वाक्षरी आहे नाशिकच्या प्रसाद देशपांडे यांची. योगायोगाने यांच्याही स्वाक्षरीमध्ये सुरुवातीला त्रिकोण आहे. नीट पाहिले तर स्वभाव वेगळे आहेत, परंतु जिद्द सारखी आहे. जिद्द कुठल्याही छंदांमध्ये महत्त्वाची असते. त्यावरच यशापयश ठरते. देशपांडे स्वत: स्वाक्षरी गोळा करतात, परंतु हे करताना सर्व व्याप सांभाळून ते अनेक माणसांना एकत्र आणतात. एखादा छंदवेडा माणूस अमुक ठिकाणी आहे असे म्हटल्यावर ते तेथे पोहोचतात. त्यांची स्वाक्षरी बघितली तर ती थोडी उजवीकडे वळलेली असून सुरुवातीला डी अक्षर आहे.
तिथेच भेटलेले आणखी एक गृहस्थ म्हणजे विनय चुंबळे. पिढीजात श्रीमंती असलेले विनय बिझनेस सांभाळून आठवड्यातील एक दिवस म्हणजे शनिवार हा छंदासाठी उपयोगी आणतात. त्यांची स्वाक्षरी बघितली तर त्यांच्या स्वाक्षरीमधील व्ही अक्षर मोठे आहे, प्रचंड पोहºयासारखे. जे मनाला आवडते, ते हा माणूस मिळवतोच. मग त्यासाठी त्यांना कितीही वाट पहावी लागली तरी. त्यांच्याकडे ७०० हून अधिक कॅमेरे आहेत, २२ ते २४ कार, जवळजवळ १२६ पेक्षा अधिक बाईक्स असे मोठे कलेक्शन आहे. त्यांच्या स्वाक्षरीमधील अप्सवरून त्यांचे कर्तृत्वही दिसते. या स्वाक्षरीमधील व्ही आणि सी ही अक्षरं पाहिली, तर माणूस छंद आणि पैसा यांना बॅलन्स करून वागणारा आहे, हे लक्षात येतं. विनय यांचा एकच दुर्गुण आहे तो म्हणजे टेम्प्टेशन. जे खूप प्रभावी आहे, ते त्यांना अत्यंत अस्वस्थ करत असते. फक्त शनिवार छंदासाठी वेळ देतो असे ते म्हणत असले, तरी जे हवे आहे आणि ते कसे मिळेल याचा विचार सतत विनय यांच्या मनात सुरू असतो.
माणसाला छंद तर हवाच पण तो छंदीफंदी नसावा हे महत्त्वाचे आहे. कुठलाही छंद स्वछंद असला तर एकवेळ चालेल, पण त्या छंदाला उनाड होऊ देऊ नये, नाहीतर पदरी निराशा येते आणि मग तो छांदिष्ट माणूस त्या गर्तेत जात राहतो.
छांदिष्ट माणसांची जगात काही कमी नाही. नोकरी व्यवसाय सांभाळून ती माणसं आपला छंद जोपासतात. छंद त्यांच्यासाठी पॅशन असतो, पण त्यासाठी मुख्य गरज असते ती पेशन्स आणि पैसे याची. पण तो छंद यांच्या आयुष्याचा भाग बनलेला असतो. मनाचा काही भाग छंदाच्या विचारानेच व्यापलेला असतो. छंद जोपासताना काही करावे लागले, अडचणी आल्या तरी ते जिद्दीने छंद जोपासतात. ही जिद्द त्यांच्या सहीतील त्रिकोणानंतर आलेल्या सलगपणात दिसते. तसेच छंदामुळे माणसे जोडण्याची कला त्यांच्या ठायी असते तीही त्यांच्या सहीत दिसून येते. छांदिष्टांचा छंदच नाही तर त्यांच्या स्वभावातही वेगळेपण आहे आणि ते सहीतून दिसते. अशा छांदिष्टांची नुकतीच नाशिकमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली. त्यावेळी त्यांच्या सह्या पाहता आल्या.