जिल्ह्यात १६६ उद्योगांची उभारणी करून होणार आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:43+5:302021-09-03T04:42:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शेतीउत्पादनावरील म्हणजे फळांसह नाचणी, वरी पिकांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून उद्योग उभारणी करण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील शेतीउत्पादनावरील म्हणजे फळांसह नाचणी, वरी पिकांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून उद्योग उभारणी करण्याची संधी केंद्र शासनाच्या सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेव्दारे प्राप्त झाली आहे. यासाठी दहा लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. जिल्हाभरातून या उद्योग उभारणीसाठी वैयक्तिक लाभार्थ्यांसह गट लाभार्थी आदी मिळवून १६६ उद्योगांची उभारणी करता येणार आहे.
केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे राबविली जाणार आहेत. याअंतर्गत प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६६ उद्योगांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये १४८ वैयक्तिक लाभार्थी राहणार आहेत. तर गट लाभार्थी म्हणून १८ उद्योगांची उभारणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे.
यात जिल्ह्याच्या शेतीत उत्पादित होणारी नाचणी व वरी या दोन पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग हे प्रथमच नव्याने सुरू करणारे असायला हवेत. तर अन्य म्हणजे आंबा प्रक्रिया, काजू प्रक्रिया आणि चिकू आदी फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग जुने असल्यास त्यांचा विस्तार करण्याची संधीही या योजनेव्दारे देण्यात आली आहे.
------------