नवीन वरसावे पूलवर सेल्फीची हौस, बेकायदा पार्किंग आणि विरुद्ध दिशेने येणारी वाहने बनली धोकादायक
By धीरज परब | Published: August 23, 2023 04:35 PM2023-08-23T16:35:16+5:302023-08-23T16:36:46+5:30
वसई खाडी वरील वरसावे नवीन पूल हा आधीच कामास विलंब झाल्याने रखडला.
मीरारोड - मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे खाडी पूल खड्डे व निकृष्ठ कामामुळे आधीच वादग्रस्त बनला असताना आता सदर पुलावर वाहने उभी करून सेल्फी घेण्याची नको ती हौस भागवली जात आहे. शिवाय पुलावर बेकायदा पार्किंग आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन अपघाताची भीती वाढली आहे.
वसई खाडी वरील वरसावे नवीन पूल हा आधीच कामास विलंब झाल्याने रखडला. या वर्षी २८ मार्च रोजी पूल वाहतुकीसाठी खुला केला असताना पहिल्याच पावसाळ्यात पुलावर खड्डे पडून आतील सळ्या दिसू लागल्या. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदार व संबंधीत विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
त्यातच खाडीवरील हा पूल असल्याने लोकं सेल्फी घेण्यासाठी तसेच विरंगुळा म्हणून ह्या पुलावर वाहने उभी करतात. पुलावरून कोणी थेट खाडीत पडल्यास वा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील पुलावर वाहने थांबवल्याने होऊ शकतो. रिक्षापासून अवजड कंटेनर, मालवाही आदी वाहने ह्या पुलावर सर्रास बेकायदा उभी केली जातात. गंभीर बाब म्हणजे पुलावर वसई कडून उलट दिशेने रिक्षा, दुचाकी पासून मोठी वाहने सर्रास बेजबाबदार वाहन चालक चालवत आहेत.
वास्तविक या पुलावरून मुंबई व ठाण्या कडून येणारे वाहने भरधाव वसई - गुजरातच्या दिशेने जात असतात. त्यामुळे पुलावर सेल्फी घेणे, विरंगुळासाठी तसेच पार्किंग म्हणून वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहने चालवणे आदी अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. यातून गंभीर व जीवघेणे अपघात होऊ शकतात. परंतु हे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच पुलावर वाहने उभी करणारे, विरुद्ध दिशेने वाहने चालवणारे यांच्यावर ठोस कारवाई साठी मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.