सेल्फी पडली महागात, सर्पदंशाने गेला सर्पमित्राचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 08:40 PM2017-09-08T20:40:30+5:302017-09-08T20:41:52+5:30
पूर्वेकडील संगीतावाडी परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र भरत केणे या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पकडलेल्या विषारी सापाबरोबर सेल्फी काढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवली, दि. 8 - पूर्वेकडील संगीतावाडी परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र भरत केणे या तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पकडलेल्या विषारी सापाबरोबर सेल्फी काढणे या तरुणाच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे.
भरत शरद केणे (27) असे या तरुणाचे नाव असून तो दत्तनगर परिसरात राहणारा होता. कोणतेही सर्प पकडण्यात पारंगत असलेला हा तरुण गुरुवारी दुपारी फोन आल्यानंतर नांदीवली परिसरात गेला होता. त्याने कोब्रा जातीचा जहाल विषारी नाग पकडला. पकडलेल्या कोब्य्राशी त्याने सेल्फी देखील काढली. मात्र या कोब्रानं चपळाईने भरतच्या पोटाला दंश केला. तरीही त्याने या कोब्य्राला सोबत आणलेल्या बरणीत भरले. मित्राने त्याला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तथापी तेथे लस उपलब्ध नसल्याने भरतला ठाण्याकडे हलविले. प्रवासादरम्यान वाटेत त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही भरतला दोन वेळा सर्पदंश झाला होता, असे नातेवाईक संतोष केणे यांनी सांगितले. सर्पमित्र भरतच्यावर शुक्रवारी दुपारी शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.