भाजप महिला मोर्चाचे सेल्फी विथ खड्डे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:12+5:302021-08-21T04:45:12+5:30
ठाणे : शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर गुरुवारी ठाणे शहर भाजप महिला मोर्चाने सेल्फी विथ खड्डे असे ...
ठाणे : शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर गुरुवारी ठाणे शहर भाजप महिला मोर्चाने सेल्फी विथ खड्डे असे अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरील रस्त्यावरच केल्याने भाजपने सत्ताधारी शिवसेनेलाच याद्वारे डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.
ठाणे शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने ठाण्याचे खड्डे, खड्ड्यांचे ठाणे, खड्ड्यात गेली स्मार्ट सिटी, ठेकेदाराचा झोल झोल... ठाण्याचे खड्डे खोल खोल अशा घोषणा देत सेल्फी विथ ठाण्यातील खड्डे असे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी रेनकोट घालून थेट खड्ड्यात बसून सेल्फी काढल्या. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आले. येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खड्डेच खड्डे असे चित्र आहे. पालिकेने या खड्ड्यांवर तात्पुरता मुलामा लावला होता. परंतु पुन्हा खड्डे पडत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, ठाणेकरांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाला आणि सत्ताधारी शिवसेनेला जाग यावी, या उद्देशाने हे आंदोलन केल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिली.
..................
प्रशासनाला जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की, शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च केला जातो. केवळ ठेकेदाराची झोळी भरण्यासाठीच हा झोल केला जात आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी जागे होऊन गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवावेत एवढीच अपेक्षा आहे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल.
(मृणाल पेंडसे - महिला शहर अध्यक्षा - भाजप, ठाणे)