निवडणूक अॅपवरही सेल्फींचा भडीमार; ‘सी-व्हिजील’वरील ८६ तक्रारी कराव्या लागल्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:07 AM2019-03-29T00:07:26+5:302019-03-29T00:07:50+5:30
निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अॅप सुरू करण्यात आले. या अॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे.
ठाणे : निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अॅप सुरू करण्यात आले. या अॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यापासून या अॅपवर आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या तक्रारींपेक्षा अनेकांनी सेल्फी शेअर केल्याने निवडणूक विभाग बुचकळ्यात पडला आहे. काहींनी चक्क वैयक्तिक तक्रारींचा सूर या अॅपवर लावला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये या अॅपविषयी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लघंन होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावले उचलण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळात बेकायदा पोस्टर, बॅनर लावले किंवा आचारसंहिता भंग होत असल्याचे एखादे प्रकरण असेल, तर प्रत्येक नागरिकाला तत्काळ तक्रार करता यावी, या उद्देशाने ‘सी-व्हिजील’ हे अॅप सुरू करण्यात आले. या अॅपवर आतापर्यंत १३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील केवळ ४७ तक्रारी या ग्राह्यधरण्यात आल्या आहेत. उर्वरित ८६ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत.
१५ जणांनी चक्क आपले सेल्फी काढून ते या अॅपवर पाठवले आहेत. काहींनी एखाद्या बॅनरपुढे उभे राहून सेल्फी काढले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. काहींनी केवळ अंधारातील रस्त्यांची छायाचित्रे पाठवली आहेत. ज्यांचा आचारसंहिता भंगाशी काहीही संबंध नाही. अशा बिनबुडाच्या तक्रारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी करावी तक्रार...
एखादे पोस्टर, बॅनर किंवा एखाद्याकडून आचारसंहिता भंग होत असल्यास त्याचे छायाचित्र काढून या अॅपवर पाठवायचे आहे. छायाचित्र धाडताना ते नेमके कोणत्या भागातील आहे, याचा उल्लेख करण्यात यावा, हे अभिप्रेत आहे. तसेच आचारसंहिता भंगाचा तपशील कमीतकमी शब्दांत लिहून अॅपवर पाठवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
100मिनिटांत तक्रारीवर होते कारवाई
या अॅपवर तक्रार आल्यानंतर ही तक्रार ज्या भागातून आली आहे, त्या भागातील निवडणूक विभागातील पथकाद्वारे फ्लाइंग स्क्वॉडकडे पाठवली जाते. त्यानंतर, पुढील १५ मिनिटांत फ्लाइंग स्क्वॉड घटनास्थळी धाव घेते. त्यानंतर, त्यावर योग्य ती कारवाई झाल्यावर त्याची इत्थंभूत माहिती ही ४५ मिनिटांमध्ये मुख्य निवडणूक विभागाला दिली जाते.