ठाणे स्थानकात रोज सहा हजार पाण्याच्या बाटल्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:32 AM2019-04-15T06:32:36+5:302019-04-15T06:32:39+5:30
लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा हजार लीटर पाणी प्रवाशांनी प्यायल्याची माहिती आहे.
ठाणे : लाखो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सहा हजार लीटर पाणी प्रवाशांनी प्यायल्याची माहिती आहे. त्यातच एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्याने आणि रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत विक्रीला बंदी केल्यामुळे ही संख्या वाढली आहे. हे प्रमाण पाऊस सुरू होताच निम्म्यावर येईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.
ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अपडाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. स्थानकातील १० फलाटांवर एकूण १६ उपाहारगृहे आहेत. याच उपाहारगृहांतून उन्हाळा सुरू झाल्याने आणि लिंबू सरबत मिळणे बंद झाल्याने दररोज एक लीटरच्या १२ बाटल्या असलेले ५०० बॉक्स म्हणजे सहा हजार लीटर पाणी दिवसाला विकले जाते. एका महिन्याचा विचार केल्यास सुमारे दोन लाख लीटर पाणीविक्री होते. मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळा आणि हिवाळ्यात हे प्रमाण निम्मे असते, असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. याआधी म्हणजे रेल्वे स्थानकांवर लिंबू सरबत विक्री सुरू होती तेव्हा दररोज बाटल्यांतून ३०० बॉक्स पाणी विकले जात होते.
दरम्यान, रिकाम्या होणाºया बाटल्यांची विल्हेवाट लावणारी क्रशिंग मशीन ज्या कंपन्यांकडे आहे, त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच त्या बाटल्या क्रश करून त्याचे प्लॅस्टिक घेऊन जाण्याचे आवाहन रेल्वे सूत्रांनी केले आहे.
सद्य:स्थितीत रोज एक लीटरच्या पाण्याच्या बाटल्यांचे ५०० च्या आसपास बॉक्स ठाण्यात विकले जात आहेत. येथे विक्री करण्ययात येणाºया पाण्याच्या बाटल्या घेऊन जास्तीत जास्त प्रवासी निघून जातात, तर रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या कचरावेचक उचलत असल्याने तितक्या प्रमाणात त्यांचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे, असे ठाणे रेल्वे स्थानकाचे संचालक राजेंद्र वर्मा यांनी सांगितले.
>कचरा न उचलल्यास कारवाईचा बडगा
मध्य रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेमुळे स्थानकांच्या टॉपटेन यादीत ठाण्याचे नाव आल्यावर रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच स्थानकातील उपाहारगृहचालकांना आपापल्या उपाहारगृहांसमोरच्या बाटल्या उचलण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांनी कचरा न उचलल्यास कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. रेल्वे स्थानकातील स्वच्छतेसाठी ठेकेदार नेमले असून त्याद्वारे स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे.