अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 04:54 AM2018-10-03T04:54:39+5:302018-10-03T04:55:30+5:30
ठाणे-पालघर जिल्हा : समायोजनाचे आदेश
सुरेश लोखंडे
ठाणे: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांचे रिक्त असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे, असा शासन निर्णय सोमवारी एक आॅक्टोबर रोजी जारी करण्यात आल्यामुळे या २६ सहायकांना दिवाळीपूर्वीच दिवाळीभेट मिळाली आहे. गेली दोन वर्षे ते विनावेतन या पदावर काम करीत होते.
या अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांना काढून टाकण्यात येणार होते. त्यांचे वेतनही बंद करण्यात आले होते. पण त्यांची नोकरी टिकावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लढा दिला. शासनदरबारी त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर यश येऊन अर्धवेळ प्रयोगशाळा सहायकांची नोकरी कायम राहिली. याशिवाय त्यांना रिक्त असलेल्या पूर्णवेळ सहायकांच्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा निर्णय राज्य शासनास घ्यावा लागला.
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील २६ सहायकांचे आता ‘रिक्त’ असलेल्या पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाच्या पदांवर, आकृतीबंध निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्याचा शासन आदेश उपसचिव चारूशीला चौधरी यांनी जारी केला. शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नसल्यामुळे दि. १२ फेब्रुवारी २०१५च्या शासन निर्णयानुसार उपरोक्त निर्णय घेणे शक्य झाले.
या समायोजनासाठी लागू होणाऱ्या अटी शर्तींनुसार, पूर्णवेळ सहायकाचे त्या शाळेतील पद एकमेव असावे, समायोजन होण्यापूर्वीच्या वेतनाची मागणी करणार नाही, असे हमीपत्र संबंधीत अर्धवेळ प्रयोगशाळा सहायक यांच्याकडून घेण्यात येईल. पूर्णवेळ समायोजन करताना प्रथम तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या संस्था, शाळांमध्ये समायोजना होणे अपेक्षित आहे. तालुक्यामध्ये पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायक पद रिक्त नसल्यास जिल्ह्यामध्ये संबंधीत सहायकाचे समायोजन करण्यात यावे, असेही उपसचिवांनी जारी केलेल्या या शासन आदेशात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन वर्षे केले बिनपगारी काम
च्शिक्षक सेनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपासून या अर्धवेळ सहायकांनी बिनपगारी काम केले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. दोन वर्षे बिनपगारी काम करूनही त्यांना नोकरीची शाश्वती नव्हती. नोकरीची टांगती तलवार डोक्यावर कायम असताना, शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रयोगशाळा सहायकांना दिलासा दिला आहे. त्यांना आता या निर्णयामुळे न्याय मिळवून देणे शक्य झाले.