संमेलनगीत आठवडाभरात होणार ध्वनिमुद्रित
By admin | Published: January 10, 2017 06:25 AM2017-01-10T06:25:57+5:302017-01-10T06:25:57+5:30
शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गीत तयार करण्यात येत आहे. सध्या त्याची जोमात तयारी सुरू असून आठवडाभरात
जान्हवी मोर्ये / डोंबिवली
शहरात होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गीत तयार करण्यात येत आहे. सध्या त्याची जोमात तयारी सुरू असून आठवडाभरात ते ध्वनिमुद्रित केले जाईल, अशी माहिती गीताचे संगीतकार केतन पटवर्धन यांनी दिली.
कवी श्रीनिवास आठल्ये यांनी संमेलनगीत लिहिले आहे. गीताचे बोल ‘संपन्नले नव्वदावे मराठी पाहा येथे साहित्य संमेलन’ असे आहे. मराठी साहित्य संमेलनाचे गीत हे मंदारमाला वृत्तात लिहिण्यात आले आहे. डोंबिवलीच्या साहित्य, संस्कृतीचा उल्लेख त्यात आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु.भा. भावे, शं.ना. नवरे, सुरेंद्र वाजपेयी तसेच डोंबिवलीचे भूषण गणेश मंदिर, गावदेवी मंदिराचा या गीतात उल्लेख आहे. हे गीत समूहगीत असून त्याचे गायन अनेक गायक मिळून करणार आहेत. या गीताचे संगीत संयोजन निखिल निजसुरे करीत आहेत. या गीतावर कथ्थक नृत्याविष्कार केला जाणार आहे. गीत हे नृत्यातून प्रतित केले जाईल. डोंबिवलीतील प्रथितयश कथ्थक गुरू हे नृत्य सादर करतील. येत्या आठवडाभरात त्याचे ध्वनिमुद्रण केले जाईल, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
संगीतकार सुखदा भावे याही संमेलनगीत तयार करीत आहे. त्यांचे गीत हे संमेलनाचे प्रमोशन करणारे असणार आहे. त्याचे ध्वनिमुद्रण थेट केले जाणार आहे. या गीताचे शब्द अनंत पेंढारकर यांनी लिहिले आहेत. डोंबिवलीतील गायक व वादकांचा या गीतात सहभाग आहे.
१३ ते १४ गायक व गायिका हे गीत गाणार आहेत. तसेच कोरससाठी नवोदित गायकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. हे प्रमोशन गीत येत्या आठवडाभरात तयार करून संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरमकडे सपूर्द केले जाणार आहे. त्यानंतर, हे गीत यू ट्यूब व आॅनलाइन व अपलोड केल्यावर ते सगळ्यांना एका क्लिकवर पाहता येणार आहे. या गीताच्या निर्मितीत साहित्यावर अधिक भर दिला गेला आहे, असे भावे यांनी स्पष्ट केले.
संमेलनाची कच्ची तालीम आज... : संमेलनात गीत, गायन, काव्यवाचन, कथाकथन, स्वगत, अभिवाचन आणि नृत्य या विविध कलाकारांना कला सादर करता येणार आहे. या सगळ्या कलाकारांचा एक कार्यक्रम संमेलनाच्या पूर्वसंध्येला बसवला जाणार आहे. त्यांना साहित्य ही संकल्पना देण्यात आली आहे. साहित्य संकल्पनेवर हा कार्यक्रम आधारित असून त्याची कच्ची तालीम मंगळवार, १० जानेवारीला प्रगती महाविद्यालयाच्या हॉलमध्ये होईल. त्यात ४० ते ५० कलाकार असतील. तालीम कच्ची असली तरी त्यापैकी एकही कार्यक्रम रद्द केला जाणार नाही. सगळे कार्यक्रम घेतले जातील. सगळ्यांना संधी दिली जाईल. गीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, नृत्य, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांच्यासह पौरणिक नृत्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती दीपाली काळे यांनी दिली.