मते वाढली तरीही सेनेला धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 01:38 AM2019-10-26T01:38:26+5:302019-10-26T01:38:31+5:30
मनसेला सुगीचे दिवस, लोकसभेच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य घटले
- अजित मांडके
ठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघांत शिवसेनेची ताकद वाढली असली, तरी ठाण्यात मात्र भाजपबरोबर शिवसेनेलाही फटका बसल्याचे दिसून आले आहे. मात्र, मुंब्रा-कळव्यात शिवसेनेला जोरदार मुसंडी मारता आलेली नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीने मतांमध्ये जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.
परंतु, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वागळे इस्टेट आणि किसननगर भागात मतांमध्ये काहीशी घट झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही सुद्धा भविष्यात शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात मात्र पुन्हा एकदा नव्याने मनसेचा उदय झाला आहे. त्याचा फायदा आता ते कसे उठवितात, हे आता आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत ठरल्याप्रमाणे चारही जागांचे निकाल लागले आहेत. ठाण्यातून भाजपचे संजय केळकर हे अपेक्षेप्रमाणे निवडून आले आहेत. परंतु, त्यांच्या मताधिक्यामध्ये प्रचंड घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेला ८३ हजारांच्या आसपास लीड मिळाले होते. मात्र, आताच्या निवडणुकीत भाजपला मात्र केवळ १९ हजारांचे लीड या मतदारसंघातून मिळविता आले आहे. दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८९ हजारांचे मताधिक्य मिळविले आहे.
मात्र, लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखांच्या आसपास मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कुठेतरी या मतांमध्येही घट झाल्याचे दिसत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघातही शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी ८३ हजारांचे लीड घेऊन भाव खाल्ला असला, तरी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेला एक लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा खारीचा वाटा होता. तर, मुंब्रा-कळवा मतदारसंघात शिवसेनेच्या मतांमध्ये कुठेही घट झाल्याचे दिसून आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती, त्यापेक्षा काही अंशी मतांमध्ये भर पडल्याचे दिसून आले आहे. उपरोक्त तीनही मतदारसंघांत शिवसेनेच्या मतांमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसत असताना त्याचा फटका भाजपलाही तितकाच बसल्याचे
चित्र निकालावरून स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरातून भाजपच्या उमेदवाराला अवघे १९ हजारांचे मताधिक्य मिळविता आले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याचा दावाही निकालापूर्वी शिवसेनेच्या खासदारांसह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला होता. परंतु, तो फोल ठरला असून भाजपची मते २० हजारांनी वाढली असली, तरी लोकसभेच्या तुलनेत मताधिक्यामध्ये सुमारे ६२ हजारांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यातील चारही मतदारसंघांत मनसेच्या इंजिनाला डबे मिळाले आहेत. यामध्ये ठाणे शहर मतदारसंघात मनसेचे इंजीन हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने टाकलेल्या इंधनाच्या मदतीने सुसाट धावल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात मनसेला तब्बल ७२ हजार मते मिळाली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मनसेला २१ हजार ५१३, ओवळा-माजिवड्यात २१ हजार १३२ मते मिळाली आहेत. एकूणच, येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेला मतरूपी मिळालेली नवसंजीवनी नक्कीच ऊर्जा देणारी ठरणार आहे. ठाण्यात तर त्यांना यानिमित्ताने महापालिकेचे चित्र बदलण्याचे संकेतच मिळाले आहेत. आता या मतांचा उपयोग ते कसा आणि कशा पद्धतीने उचलतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.