भिवंडीत सेना-भाजपचा घरोबा, पं.स. सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीसाठी आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:13 AM2020-07-06T00:13:42+5:302020-07-06T00:14:39+5:30
शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही सेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक झाली. शिवसेनने सभापतीपद आपल्याकडे ठेवले तर उपसभापतीपद भाजपला सोडले.
भिवंडी - राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणार शिवसेना- भाजप भिवंडी पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत एकत्र आल्याचे रविवारी दिसले. शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही सेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक झाली. शिवसेनने सभापतीपद आपल्याकडे ठेवले तर उपसभापतीपद भाजपला सोडले.
सभापतीपदी शिवसेनेचे विकास भोईर तर उपसभापतीपदी भाजपचे जितेंद्र डाकी यांची निवड झाली. सेना- भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्याने पिठासीन अधिकारी शशिकांत गायकवाड यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
कल्याणमध्ये सेना
टिटवाळा : कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या अनिता दशरथ वाकचौरे, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे रमेश बांगर निवडून आले. कल्याण पंचायत समितीचा विचार केला, तर पंचायत समितीच्या १२ गणांमधून भाजपचे ५, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे पक्षीय बलाबल होते. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना ५ आणि शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना ७ मते मिळाली.
शहापूर पंचायत समितीवर पुन्हा भगवा
शहापूर : शहापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी आणि उपसभापतीपदी शिवसेनेनेचे अनुक्रमे रेश्मा मेमाणे व उपसभापतीपदी जगन पष्टे यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे शहापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकला आहे.
सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही जागांवर बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी नीलिमा सूर्यवंशी यांनी जाहीर केले.
सभापतीपदासाठी शिवसेनेच्या मेमाणे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापतीपदासाठी पष्टे व भाजप पुरस्कृत असलेले रिपाइंचे प्रकाश वीर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र वीर यांनी अर्ज मागे घेतल्याने उपसभापतीपदाचीही निवड बिनविरोध झाली.
यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, काशिनाथ तिवरे, अरुण पानसरे, विठ्ठल भेरे, संतोष शिंदे, भरत बागराव, प्रकाश वेखंडे, सुभाष विशे, बाळा धानके
रश्मी निमसे, प्रतिभा भागवत आदी उपस्थित होते.
मुरबाडमध्ये सभापतीपदी श्रीकांत धुमाळ
मुरबाड : मुरबाड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे श्रीकांत धुमाळ व उपसभापतीपदी अरु णा खाकर यांची निवड झाली. भाजपचे विष्णू घुडे यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेऊन बंडखोरी करु न आपला उमेदवारी अर्ज सादर केला, मात्र त्यांचा पराभव झाला. पीठासीन अधिकारी म्हणून अमोल कदम यांनी काम पाहिले. पंचायत समितीवर भाजपचे ११ व शिवसेनेचे पाच सदस्य असताना एकहाती भाजपची सत्ता होती. असे असतानाही भाजपने शिवसेनेला उपसभापतीपद दिले होते. सभापतीपद हे मागास प्रवर्गासाठी राखीव पडल्याने निवडणूक बिनविरोध होईल, असे वातावरण होते. शिवसेनेने भाजपचे घुडे यांना बंडखोरी करण्यास भाग पाडले. त्यांनी भाजपचे उमेदवार धुमाळ यांच्याविरोधात तर खाकर यांच्याविरोधात प्रकाश सुरोशे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या उमेदवाराला १० तर बंडखोराला पाच मते पडली.
अंबरनाथमध्ये सभापतीपदी अनिता निरगुडा
बदलापूर : अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला आहे. सभापतीपदी अनिता निरगुडा तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख आणि पंचायत समितीचे गटनेते बाळाराम कांबरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अंबरनाथ पंचायत समितीत आठ सदस्यांपैकी शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचा एक सदस्य आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार अंबरनाथ पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित झाले होते. शिवसेनेच्या सदस्य असलेल्या निरगुडा यांना ही संधी मिळाली. तर बाळाराम कांबरी हे उपसभापती झाले आहेत. गेल्या अडीच वर्षात पंचायत समितीच्या कार्यकाळात ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत. जिल्हा परिषद आणि राज्यात सत्ता असल्यामुळे या पुढील काळात विकासकामांवर भर देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसभापती बाळाराम कांबरी यांनी सांगितले.