स्थायी सभापतीपदावरून सेना-भाजप आमनेसामने, २२ मार्च रोजी नव्या सदस्यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:27 AM2021-03-19T08:27:12+5:302021-03-19T08:28:00+5:30
उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये भाजपचे नऊ, शिवसेना पाच तर रिपाइं व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले.
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या जागी २२ मार्च रोजी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीत भाजपचे बहुमत राहणार असून सभापती पदावरून पुन्हा शिवसेना-भाजप आमनेसामने उभे ठाकणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये भाजपचे नऊ, शिवसेना पाच तर रिपाइं व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले. समितीच्या एकूण १६ पैकी आठ सदस्य एक एप्रिल रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड २२ मार्चच्या सभेत होणार आहे.
स्थायी समिती सभापतीपद पक्षाकडे राहण्यासाठी भाजप कट्टर समर्थक सदस्यांना पाठविणार आहे. भाजपमधील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती पासून दूर ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीप्रमाणे भाजप पक्षातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवक सोबत जुळवून घेत असल्याचेही बोलले जात आहे.
पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापतीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेना राजकीय डावपेच आखत आहेत. शिवसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, लिलाबाई अशान, ज्योती गायकवाड, भाजपचे विजय पाटील,जमनुदास पुरस्वानी, प्रकाश नाथानी तर रिपाइंच्या अपेक्षा भालेराव व राष्ट्रवादी पक्षाचे भारत गंगोत्री निवृत्त होणार आहेत.
जाणकारांचे लक्ष
स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीपदाची निवड होणार आहे. सभापती पदासाठी शिवसेना व भाजप आमनेसामने उभे ठाकणार असून, या निवडणुकीत ओमी कलानी टीम महत्त्वाची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निवडणुकीकडे एकूणच राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.