हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेच्या मतपेटीवर डल्ला, भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 05:21 AM2018-06-08T05:21:30+5:302018-06-08T05:39:46+5:30

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे.

Sena's ballot box, BJP's innings | हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेच्या मतपेटीवर डल्ला, भाजपाची खेळी

हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेच्या मतपेटीवर डल्ला, भाजपाची खेळी

Next

ठाणे : हिंदुत्वाच्या चावीने शिवसेनेची मतपेटी उघडून ठाणे शहर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकदीचा लाभ घेण्याकरिताच भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांत युतीची गरज भासू लागली आहे. मागील निवडणुकीत मुस्लिम, दलितांची मते भाजपाला मिळाली. मात्र, देशभरात या दोन्ही समाजांवर संघ परिवारातील कार्यकर्त्यांनी हल्ले केल्याने ही मते गमवावी लागली, तर समविचारी पक्षाची मते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काबीज करून घसरता आलेख सावरणे, हा भाजपाचा हेतू आहे. त्याकरिता, ठाण्यात भाजपाला शिवसेनेची नितांत गरज आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपाला अभूतपूर्व यश लाभले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती असल्याने त्या पक्षालाही उत्तम यश लाभले. भाजपाच्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे व विकासाचे आश्वासन भावल्याने मुस्लिम, दलितांनी मते दिली होती. मात्र, आता तेच यश पुन्हा पदरात पडण्याची सुतराम शक्यता नाही. देशभर गोमांसावरून संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांवर हल्ले केले. दलित तरुणांच्या हत्या, मारहाण अशा घटना घडल्या. ख्रिश्चनांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे मागील वेळी मिळालेली मते यावेळी भाजपा गमावणार आहे. मतांची ही घट भरून काढण्याकरिता भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा २०१९ च्या निवडणुकीत केंद्रस्थानी आणण्याचे निश्चित केले आहे. बुलेट ट्रेनपासून समृद्धी महामार्गापर्यंत भाजपा सरकारच्या अनेक विकास प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांची युती अशक्य आहे. साहजिकच, हिंदुत्वाचा मुद्दा, घसरती लोकप्रियता टिकवण्याकरिता आणि शिवसेनेसारख्या मित्रपक्षाला चुचकारण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.
मुंबई हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बृहन्मुंबईत भाजपाचे १५, तर शिवसेनेचे १४ आमदार विजयी झाले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाले. भाजपा व शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांतील अंतर हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढे होते. दोन्ही पक्षांची युती झाली, तर दोन्ही पक्षांना आपल्या जागा राखणे शक्य होईल. लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर विजय मिळवणाऱ्या शिवसेनेला यावेळी युती झाली, तरच यातील बहुतांश जागा टिकवता येतील, असे दोन्ही पक्षांतील नेत्यांना वाटते. पालघर पोटनिवडणुकीत परस्परांविरुद्ध उमेदवार देण्यामागे हेच विस्तारवादाचे राजकारण होते.

गिळणार नाही तर फोडणार या कात्रीत पक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेबद्दल काडीचेही प्रेम नाही. मात्र, गरजेपोटी शहा बुधवारी मातोश्रीची पायरी चढले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या काळात युतीमध्ये असलेले भावनिक नाते संपुष्टात आले आहे.
आता केवळ व्यावहारिक संबंध उरले आहेत. शिवसेनेच्या बलस्थानांचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करायची व हळूहळू शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याकरिता खच्चीकरण करायचे, हीच भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची कार्यपद्धती आहे, हे शिवसेनेलाही मान्य आहे.
मात्र, भाजपासोबत गेले तर ते शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न करणार व गेले नाही तर शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणार, अशा कात्रीत सध्या शिवसेनेचे नेतृत्व सापडले आहे.

Web Title: Sena's ballot box, BJP's innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे