सेनेलाच ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा इशारा!, कुणबी नेत्यांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:50 AM2018-02-02T06:50:31+5:302018-02-02T06:50:44+5:30
भिवंडीच्या एकाच परिसराला तीन पदे दिली गेली, कल्याणमध्ये हातची सत्ता घालवली, शहापूरमध्ये राष्ट्रवादीला अकारण वाटेकरी बनवले या पद्धतीने काम केल्यास ज्या ठाण्याने शिवेसेनेला सत्तेची चव चाखायला दिली ते घरही हातचे जाईल. पक्षाची वाताहत होईल.
पडघा : भिवंडीच्या एकाच परिसराला तीन पदे दिली गेली, कल्याणमध्ये हातची सत्ता घालवली, शहापूरमध्ये राष्ट्रवादीला अकारण वाटेकरी बनवले या पद्धतीने काम केल्यास ज्या ठाण्याने शिवेसेनेला सत्तेची चव चाखायला दिली ते घरही हातचे जाईल. पक्षाची वाताहत होईल. कुणबी समाजाला डावलून इतर पक्षांना आमच्या डोक्यावर लादणार असाल; तर आम्ही राजीनामे देतो, अशा इशारा पडघ्यातील चिंतन बैठकीत कुणबी समाजातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिला. तेव्हा वातावरण गंभीर बनले होते.
शिवसेनेत एकीकडे मराठा आणि ग्रामीण भागात आगरी समाजाचे प्राबल्य वाढत असल्याने, जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतरही सभापतीपदे देताना कुणबी समाजाला डावलण्यात आल्याने संतापलेल्या त्या समाजातील शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी गुरूवारी संध्याकाळी पडघ्यात चिंतन बैठक घेतली. भिवंडी, शहापूर आणि कल्याणमधील प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. मुरबाड आणि अंबरनाथच्या प्रतिनिधींशी दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे. ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यावर या प्रतिनिधींचा रोष असल्याने जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे यांना बैठकीच्या ठिकाणी पाठवून संतप्त शिवसैनिकांचे म्हणणे समजून घेण्यासाठी पाठवले. प्रत्यक्ष बैठकीत बोलणाºया प्रतिनिधींनी प्रकाश पाटील नव्हे, तर एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य करत जिल्ह्याकडे, तेथील सामाजिक समतोलाकडे लक्ष देण्याचा इशारा दिला.
शिवसेनेचे भिवंडी, शहापूर व कल्याणचे संपर्कप्रमुख विष्णू चंदे व कल्याण तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी आयोजित केलेल्या या शिवसेनेच्या कुणबी चिंतन शिबिरात समाजातील शिवसैनिकांकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व शहापूरचे तालुकाप्रमुख मारु ती धिरडे यांच्यासमोर तिखट प्रतिक्रि या व्यक्त करण्यात आल्या. आजवर झालेल्या अन्यायाचा पाढाही वाचला. यावेळी कल्याण ग्रामीणच्या कमिटीने तसेच विष्णू चंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने लांडगे यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करून पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, असे सुचवले. कल्याण तालुका विधी समितीचे अध्यक्ष अल्पेश भोईर यांनी कल्याण पंचायत समितीची सत्ता हातातून गेल्याने किमान जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळावे, यासाठी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासमोर कैफियत मांडली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
शिंदेच्या घरावर मोर्चाचा इशारा
कुणबी समाजाविरोधात काम करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढावा. समाजावर असाच अन्याय होणार असेल, तर याचे परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भोगावे लागतील, असा इशारा अंबाडीचे विभागप्रमुख संजय पाटील यांनी दिला.
भिवंडी महापालिकेतही स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान मला डावलल्याचे उपशहरप्रमुख मनोज गगे यांनी सांगितले. विभागवार पदे देणे गरजेचे असतानाही एका ठराविक विभागातच पदे दिल्याची नाराजी विभागप्रमुख के. बी. विशे यांनी व्यक्त केली.
लोणे यांचा बांध फुटला
या बैठकीदरम्यान भाषण करताना कल्याणचे तालुकाप्रमुख वसंत लोणे भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू आवरता आले नाही. समाजावर नेहमीच अन्याय होत असल्याचे विष्णू चंदे यांनी सांगितले.
अखेर लांडगे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. तुमच्या भावना शिंदे यांच्या कानावर घातल्या जातील आणि त्यांच्याशी भेट घडवून आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर काही काळ थांबून लांडगे यांनी उपस्थित नेत्यांची समजूत काढली. काही जणांना फोन करून वातावरण कसे निवळेल, यासाठी प्रयत्न केले.