सेनेच्या वैशाली खराडे भाजपात, निवडणुकीत तिकीट कापल्याने झाल्या होत्या नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:47 AM2017-08-24T03:47:01+5:302017-08-24T03:47:04+5:30
महापालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले. अशाच प्रकारे तिकीट कापल्याने ३५ वर्षांपासून सेनेच्या निष्ठावंत मानल्या जाणाºया महिला उपजिल्हा संघटक वैशाली खराडे
भार्इंदर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार आयात करून निष्ठावंतांना डावलले. अशाच प्रकारे तिकीट कापल्याने ३५ वर्षांपासून सेनेच्या निष्ठावंत मानल्या जाणाºया महिला उपजिल्हा संघटक वैशाली खराडे यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे सेनेला चांगलाच धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाच्या कार्याला सतत धावून जाणाºया खराडे यांनी यंदाची महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. तसे आदेशही त्यांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून त्यांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली.
परंतु, निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील यांनी सेनेत प्रवेश केल्याने ऐनवेळी खराडे यांचे तिकीट कापण्यात आले. खराडे यांनी यापूर्वी पालिका निवडणूक तीन वेळा लढवली आहे.
राष्टÑवादीतून सेनेत प्रवेश घेतलेल्या माजी महापौर कॅटलिन परेरा यांच्यासोबत प्रचार सुरू केला होता. परंतु, उमेदवारी हिसकावून घेतल्याने खराडे यांनी प्रचार गुंडाळून ठेवला. याचा धसका कॅटलिन यांनी घेत त्यांचे ब्लडप्रेशर कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
कॅटलिन यांच्याखेरीज प्रभाग ८ मधील उर्वरित तीन जागांवरील सेनेच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. याचे खापर खराडे यांच्या डोक्यावर फुटू लागल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत थेट सेनेलाच सोडचिठ्ठी दिली. यामुळे पक्षातील घुसमट हळूहळू बाहेर येऊ लागली असल्याचे बालले जात आहे.
३५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेचे निष्ठेने कार्य करत होते. परंतु, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असतानाही ऐनवेळी बाहेरील व्यक्तीसाठी माझे तिकीट कापण्यात आले. गेल्या निवडणुकीतही जाणीवपूर्वक माझ्यासमोर बलाढ्य उमेदवार उभे केले गेले. किती अपमान सहन करायचा.
- वैशाली खराडे.
भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्याने सेनेत राम उरला नसल्याची निष्ठावंतांची भावना आहे. निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी आयारामांना उमेदवारी दिल्याने सेनेत नाराजांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत शिवसेनेतील आणखी निष्ठावंत भाजपात पक्षप्रवेश करतील.
- हेमंत म्हात्रे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष