‘मुले, नातू-नात यांना मराठी शाळेत पाठवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:31 AM2019-05-03T00:31:22+5:302019-05-03T00:31:36+5:30
स.वा. जोशी शाळेचा वर्धापन दिन : मराठी शाळा टिकवण्याकरिता बैठकीत घेतला निर्णय
डोंबिवली : मराठी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशाला गळती लागली असून ती थांबत नाही, ही शोकांतिका आहे. पण, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवणाऱ्या संस्थांवर टीका करण्यापेक्षा मराठी शाळा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे आणि शाळेच्या वास्तूच्या नूतनीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन स. वा. जोशी शाळेत झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी केले. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली मुले, नातू-नात यांना मराठी माध्यमाच्या शाळेत आवर्जून प्रवेश घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
स. वा. जोशी शाळेचा ८२ वा वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला. यावेळी उपकार्याध्यक्ष छायाचित्रकार प्रदीप गोसावी, विकास पुराणिक, किरण फडे, रवींद्र तामरस, अशोक साळी, अर्चना कदम, समता पावसकर आदींच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पटांगणावर मेळावा झाला. यावेळी १२०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. ८८ वर्षीय कमलाकर दातार हे ज्येष्ठ माजी विद्यार्थीही उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी शाळेला उभारी मिळावी, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होणे अत्यावश्यक असून शाळेचे नूतनीकरण आवश्यक आहे, असा सूर यावेळी व्यक्त झाला.
शाळेच्या नूतनीकरणात सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची मुले, नातू, नात यांना आवर्जून मराठी शाळेमध्ये प्रवेश घेणे, त्यांना इंग्रजी माध्यमाप्रमाणे शिक्षण देणे, यासाठी संस्थेच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला सढळ हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
संस्थेच्या डोंबिवली, उरण, ठाणे, भिवंडी, डुंगरेवडघर, कुर्ला आदी ठिकाणी शाळा आहेत. त्या शाळा मराठी माध्यमाच्या असून एकेकाळी तेथे प्रवेशासाठी रांगा लागायच्या. पण, आता मराठी शाळेत प्रवेशासाठी पालकांचा फारसा कल दिसून येत नाही. तो वाढावा, यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे गोसावी यांनी सांगितले.
नूतनीकरणामध्ये असा असावा सहभाग
वर्गखोल्या, जिने, पॅसेज, प्रसाधनगृहे, कार्यालय, ग्रंथालय, वाचनालय, स्टाफरूम यांचे नूतनीकरण. संपूर्ण इमारतीस अंतर्बाह्य रंगरंगोटी, इमारत डागडुजी, बाहेरून-आतून प्लास्टर, विद्यार्थी दत्तक योजना, संपूर्ण इमारत विद्युतयोजना, वर्गखोल्यांमध्ये स्मार्टबोर्ड, संगणक, पंखे, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावर बेंचेस अशा पद्धतीने वस्तुरूपामध्ये साहाय्य करण्यासह आर्थिक साहाय्य करण्यात यावे, असे आवाहन यावेळी
करण्यात आले.