आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा; एकलुत्या मुलीचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:39 AM2018-08-24T04:39:10+5:302018-08-24T06:55:08+5:30
वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने त्यांची एकुलती एक मुलगी आली नाही
मनोर (पालघर) : वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने त्यांची एकुलती एक मुलगी आली नाही. एवढेच नव्हे तर आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा. आईचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलने घडवा, असे तिने सांगितले.
डोंगरी भागातील मनोर हायस्कूलजवळ राहणाऱ्या निरीबाई धीरज पटेल (६५) या पारशी महिलेचे बुधवारी निधन झाले. अहमदाबाद येथे राहत असलेली त्यांची एकुलती एक मुलगी व जावयाशी गावकºयांनी संपर्क साधला. आपण कधी आणि किती वाजेपर्यंत येणार आहात, अशी विचारणा केल्यावर आम्हाला येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मग अंत्यदर्शन कसे घेणार, त्यासाठी कितीवेळ थांबायचे? या प्रश्नावर व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला त्यांचे दर्शन घडवा, असे त्यांची मुलगी व जावयाने सांगितले. त्यांच्या अस्थी तुम्ही कधी स्वीकारणार, यावर तुम्ही त्या कुरिअरने पाठवा, असे उत्तर मिळाले. त्यामुळे ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्याचे ठरविले. पारशी समाजाची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांनी हिंदू पद्धतीने अंत्यविधी केले. शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख दिलीप देसाई, शमीम खान, ए. एस. राणे, खलिल भाबे, कुमावत, बिलाल रईस, संजय दातेला, किशन भुयाल, राकेश वाडीकर, समीर यांनी त्यांची अंत्ययात्रा काढून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.