मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवा, सरकार सकारात्मक, मंगलप्रभात लोढा यांची अंगणवाडीसेविकांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:05 AM2022-09-02T06:05:20+5:302022-09-02T06:05:58+5:30

Anganwadi workers: अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी विभागाने प्रस्ताव पाठवावा, त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाणे येथील कार्यक्रमात गुरुवारी केले. 

Send salary hike proposal, government positive, Mangalprabhat Lodha's testimony to Anganwadi workers | मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवा, सरकार सकारात्मक, मंगलप्रभात लोढा यांची अंगणवाडीसेविकांना ग्वाही

मानधनवाढीचा प्रस्ताव पाठवा, सरकार सकारात्मक, मंगलप्रभात लोढा यांची अंगणवाडीसेविकांना ग्वाही

googlenewsNext

ठाणे : राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडीसेविका करत आहेत. स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी विभागाने प्रस्ताव पाठवावा, त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाणे येथील कार्यक्रमात गुरुवारी केले. 

महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे पाचव्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय प्रारंभ लोढा यांच्या हस्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत काजूवाडी येथील महापालिका शाळेत गुरुवारी झाला. यावेळी ज्येष्ठ महिला सुमित्रा गुप्ता, उपायुक्त गोकुळ देवरे, एकात्मिक सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूल सक्षम, तर देश सक्षम, असा संदेश दिला होता. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार काम करत आहे. यावेळी राष्ट्रीय पोषण महिना प्रारंभानिमित्त सकस पाककृती प्रदर्शनाचे उद्घाटन लोढा व सुमित्रा गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी लोढा यांनी अंगणवाडीतील बालकांशी व अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून पोषण आहाराविषयी माहिती घेतली.  

गरोदर महिलांना योग्य व सकस आहार दिल्यास बालकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. यासाठी अंगणवाडी सेविका उत्कृष्ट काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा, अशी विनंती म्हस्के यांनी यावेळी केली.

जनजागृतीवर देणार भर
या पोषण महिना कार्यक्रमाद्वारे राज्यात १ ते ३० सप्टेंबर या काळात १ लाख १० हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांचे वजन तपासणे, सकस आहारासंबंधी जनजागृती करणे, महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा आदी माहिती अग्रवाल यांनी यावेळी दिली.

Web Title: Send salary hike proposal, government positive, Mangalprabhat Lodha's testimony to Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.