बालेकिल्ल्यातच सेनेला बंडखोरीची लागण
By admin | Published: January 13, 2017 06:46 AM2017-01-13T06:46:05+5:302017-01-13T06:46:05+5:30
चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रस्थापितांनी प्रत्येकी दोन जागांची मागणी लावून धरली आहे. त्यातच बालेकिल्ला
उल्हासनगर : चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने प्रस्थापितांनी प्रत्येकी दोन जागांची मागणी लावून धरली आहे. त्यातच बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परिसरात शिवसेनेतील इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षापुढे बंडखोरीची भीती आहे. उमेदवारीच्या वाढत्या मागणीमुळे जिल्हास्तरीय नेते त्रस्त झाले आहेत. मराठा सेक्शन, गायकवाडपाडा, संतोषनगर, शहाड गावठाण परिसरात बंडखोरीने डोके वर काढले आहे. हे बंडोबा वेळीच थंड झाले नाहीत, तर बालेकिल्ल्याला भगदाड पडण्याची भीती आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत दरवेळी सिंधी-मराठी वाद उफाळून येतो. मराठी भाषक परिसरातून बहुतांश शिवसेना, मनसे, रिपाइंचे नगरसेवक; तर सिंधी परिसरातून भाजपासह साई व काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून येतात. साई व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मराठी परिसरात पाय पसरल्याने शिवसेना-रिपाइंच्या उमेदवारांना धोका निर्माण झाला; तर शिवसेना व रिपाइंचा एकही नगरसेवक सिंधीबहुल परिसरातून निवडून आला नाही. विठ्ठलवाडी-शांतीनगर परिसर, संतोषनगर-महादेवनगर, मराठा सेक्शन, शहाड गावठण परिसर, कैलास कॉलनी-गायकवाड पाडा, संभाजी चौक परिसर, सी ब्लॉक परिसर हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. त्या बालेकिल्ल्यातच इतर पक्षांनी हातपाय पसरल्याने आधीच शिवसेनेपुढे धोका निर्माण झाला आहे. त्यात पक्षातील इच्छुक वाढल्याने आधी ढासळता पाया आणि त्यात बंडाची भीती असा दुहेरी तिढा शिवसेनेपुढे आहे.
कॅम्प नं-४ मराठा सेक्शन या शिवसेना बालेकिल्ल्यातून जयश्री कांबळी, सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव व शिवसेना पुरस्कृत नगरसेवक सुनील सुर्वे निवडून आले. मात्र इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याने पक्षासमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. तिच परिस्थिती प्रभाग क्रमांक २० मध्ये आहे. येथून महापौरपदी असलेल्या अपेक्षा पाटील, प्रधान पाटील, समीधा कोरडे, जयेंद्र मोर निवडून आले. यावेळी प्रभाग तीन सदस्यीय झाला असून त्यापैकी एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे सध्याच्या चौघांपैकी दोघांनाच पक्षाचे तिकिट मिळणार असून पाटील कुटुंबांनी प्रभागावर हक्क सांगितला आहे. सुमिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांच्यासह माजी नगरसेवक कैलास तेजी यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली असून त्यातून बंडखोरीची शक्यता व्यक्त होत आहे. संतोषनगर, महादेवनगर परिसरातून शिवसेनेचे धनजंय बोडारे, वसुधा बोडारे, लीलाबाई आशान निवडून आले आहेत.
विठ्ठलवाडी, शांतीनगर प्रभागातून माजी महापौर राजश्री चौधरी, विजय सुफाळे निवडून आले असून राष्ट्रवादीच्या नगरसेविका बहेनवाल यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. प्रभागावर एकहाती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे वर्चस्व असल्याने बंडखोरी नाही. मात्र शहाड गावठाण, संभाजी चौक-लालचक्की परिसरासह सी ब्लॉक या शिवसेना बालेकिल्यात बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
प्रस्थापितांचा हट्ट कायम
शिवसेना बालेकिल्यात इच्छुक उमेदवाराच्या वाढत्या संख्येने बंडखोरीने डोके वर काढले असतानाच प्रस्थापित नगरसेवकांची दोन तिकिटांची मागणी कायम आहे. बंडखोरांपेक्षा प्रस्थापित नेते व नगरसेवक हेच पक्षाला घातक ठरत असल्याचे बोलले जाते.
च्त्यांना तिकिट नाकारून होतकरू व कट्टर शिवसैनिकाला पक्षाचे तिकिट देण्याची मागणी होते आहे. मात्र ते शक्य नाही. गेल्या दहा वर्षांच्या सत्ता काळात एकही योजना पूर्ण करू शकले नसल्याचा ठपकाही सेनेवर असल्याने मराठीजनांत नाराजी आहे.