सेनेला भाजपाचा शह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:05 AM2017-08-04T02:05:45+5:302017-08-04T02:05:45+5:30
दारावर लाथा मारत, खुर्च्यांची मोडतोड करत आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देत मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी धिंगाणा घातल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी
कल्याण : दारावर लाथा मारत, खुर्च्यांची मोडतोड करत आणि आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या देत मंगळवारी कल्याण-डोंबिवलीत सत्तारूढ शिवसेनेच्या नगरसेवकांनी धिंगाणा घातल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी गुरूवारी आयुक्त वेलरासू यांची भेट गेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि शिवसेनेच्या आक्रमकतेविरोधात सहकार्याची भूमिका घेतली.
पालिकेतील गोल्डन गँग हवी ती काम मिळवते, टेंडरमध्ये रिंग करते हे ठावूक असल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी टेंडर माफियांविरोधात कारवाईचे आश्वासनही आयुक्तांकडून पदरात पाडून घेतले.
या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. पक्ष म्हणून भाजपाचा आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा वेलरासू यांना पाठिंबा असल्याचे गटनेते वरुण पाटील यांनी स्पष्ट केले. आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत स्मार्ट सिटी निधी, अमृत निधीच्या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा करणे, २७ गावांतील पाणी समस्या, नगरसेवक निधीची कामे व त्यांच्या फायली मंजूर होण्यास लागणारा विलंब, मागील तरतुदींपेक्षा जास्त झालेल्या खर्चाची कामे, गणेशोत्सवापूर्वीची कामे, बीएसयूपी योजनेत वाटप झालेल्या घरांमध्ये राहण्यायोग्य सुविधा नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. निविदांमध्ये होणाºया टेंडर- रिंगमाफियांच्या हस्तक्षेपाचा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला.
चर्चेअंती आयुक्तांनी १५ ते २० लाखांपर्यंतची नगरसेवक निधीची कामे तत्काळ सुरू करणार असल्याचे सांगितले. २७ गावांतील पाणीपुरवठा व जलनि:सारणाची कामे प्राधान्याने करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
तरतुदींपेक्षा जादा खर्च झालेल्या कामांचा आढावा घेऊन इतर विकासकामांना गती देणार, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करणार आहोत. महापालिकेत टेंडर रिंगमाफियांचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही वेलरासू यांनी या वेळी सांगितले.
शिवसेनेने पदे देताना भाजपाची कोंडी केल्याने, प्रसंगी खळखळ केल्याने दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर तडजोड होऊन ठरलेली पदे दिली गेली होती. पण वेगवेगळ््या प्रकल्पांच्या श्रेयावरून दोन्ही पक्षात सतत कुरघोडी सुरू असते. त्यामुळे आताही नुकतेच पद स्वीकारलेल्या आयुक्तांची शिवसेनेने कोंडी करत त्यांना गेल्या दोन वर्षांतील अपयशाचा जाब विचारल्याने भाजपाने लगोलग आयुक्तांना पूर्ण पाठिंबा देत राजकीय हिशेब चुकता केला.