जलवाहतुकीच्या श्रेयावरून सेनेत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:13 AM2018-03-28T00:13:08+5:302018-03-28T00:13:08+5:30
जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाच्या सोमवारी केलेल्या सादरीकरणातून ठाणे महापालिका आयुक्त संजीव
ठाणे : जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाच्या सोमवारी केलेल्या सादरीकरणातून ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी लोकप्रतिनिधींना डावलल्याने शिवसेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत असताना, अशाप्रकारे त्याचे श्रेय केवळ प्रशासनाने घेणे चुकीचे असल्याचे मत शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
महासभेच्या निमित्ताने आयुक्त आणि शिवसेनेत आधीच ठिणगी पडली असताना आता जलवाहतुकीचा श्रेयवाद पेटण्याची चिन्हे आहेत.
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा जयस्वाल यांनी सोमवारी केली. परंतु, आयुक्त ठाण्यात येण्यापूर्वीच या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा केला असल्याची भूमिका शिवसेननी घेतलीे. असीम गुप्ता आयुक्त असताना सर्वप्रथम या योजनेचे प्रेझेंटेशन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना दाखवले होते. जयस्वाल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर याकरिता जेवढे प्रयत्न केले तेवढेच किंबहुना जास्त प्रयत्न पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, डॉ. शिंदे आणि कपिल पाटील यांनी केले आहेत. त्यामुळे या योजनेत कोणतीही प्रगती होत असेल तर आयुक्तांनी लोकप्रतिनिधींनासुद्धा विश्वासात घेणे अपेक्षित होते, असे सेनेच्या नेत्यांचे मत आहे. आयुक्त प्रसिद्धीलोलूप असल्याचा आरोप त्यांनी केला.