डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्यांमुळे ज्येष्ठ नागरिक भयभित: केडीएमसीने तात्काळ उपाय करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 07:29 PM2017-12-12T19:29:31+5:302017-12-12T19:38:39+5:30
डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर तातडीने उपाययोजना करावी, आणि ज्येष्ठांचा जीव वाचवावा असे आवाहन ज्ञानदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना करण्यात आले आहे.
डोंबिवली: शहरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर तातडीने उपाययोजना करावी, आणि ज्येष्ठांचा जीव वाचवावा असे आवाहन ज्ञानदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना करण्यात आले आहे.
या संघाचे अध्यक्ष गजानन बाणईत यांनी ते पत्र वेलरासू यांना दिले आहे. डॉ. आनंद हर्डीकर यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले की, सुनिल नगर भागात ही समस्या वाढली असून त्याकडे महापालिकेचा कानाडोळा होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्लयामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात चार जणांना कुत्रे चावले आहेत. त्यांना इजा झाली असून त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेला वेळोवेळी सूचित करण्यात आले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भटक्या कुत्र्यांवर कुठलेही नियंत्रण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी कुत्रे पकडून नेण्यात आले, पण निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचे कारण सांगत पुन्हा ते ऐरियात सोडण्यात आले. त्यामुळे कुत्र्यांचे हल्ले करण्याचे प्रकार थांबलेले नसून ते जैसे थेच असल्याचे पत्रात म्हंटले आहे. ज्येष्ठांसह सर्वसामान् य नागरिकांची या त्रासातून सुटका करावी, तसेच या पत्रानंतर महापालिकेने काय उपाययोजना केली ते लेखी कळवावे असेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.