पैसे देऊन लस घेण्यात पालघरचे ज्येष्ठ नागरिक पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:24 PM2021-03-12T23:24:42+5:302021-03-12T23:25:07+5:30
सहा हजार ७२१ ज्येष्ठांनी घेतली लस : महिलाही आघाडीवर
हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : प्रत्येक जिल्ह्यात खासगी रुग्णालयांतही कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पालघर जिल्ह्यात आजवर ४६ हजार ५९५ जणांनी कोरोना लस घेतली असून, शासकीय रुग्णालयांमध्ये ४३ हजार १४७ जणांनी, तर खासगी रुग्णालयांत तीन हजार ४४८ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात पुढे असून, आजवर सहा हजार ७२१ ज्येष्ठ नागरिकांचे जिल्ह्यात लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, वसई - विरार महापालिका हद्दीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दाखल रुग्णांची संख्या दीडशेच्या खाली आली होती. त्यामुळे लवकरच कोरोनामुक्तीची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु नंतर नियम शिथिल झाल्यावर आणि लोकल सर्वांसाठी खुली झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
तरुणांपेक्षा एक पाऊल पुढे
कोरोनाबाधेचा जास्त धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. त्यातल्या त्यात अन्य कोणते आजार असतील, तर त्यांना त्याचा जास्त त्रास होऊन जीव गमावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोरोना लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे असल्याचे दिसून येत आहे.
मी लस घेतली, तुम्ही ?
लसीकरणाची चांगली व्यवस्था उभारण्यात आली आहे. काही संस्थांच्या सहभागातून अधिकाधिक लसीकरण केंद्र वाढवून सर्वांना याचा लाभ द्यावा.
- रमाकांत पाटील,
टेम्भोडे
मी लस घेतल्यानंतर दिवसभर आराम करून पुन्हा कामाला सुरूवात केली. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी निसंकोचपणे लस घ्यावी.
- विजू तांडेल,
ज्येष्ठ नागरिक, सातपाटी
महिला कुठे?
कोरोना लसीकरण सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर, फ्रंटलाइन वर्करना देण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आता ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. वसई - विरारसह पालघर जिल्ह्यात महिलासुद्धा लस घेण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.