मीरा भाईंदर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव गोविंदराव म्हात्रे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 09:17 PM2019-12-15T21:17:49+5:302019-12-15T21:21:36+5:30
भाऊ म्हणुन परिचित होते. पारदर्शक व नियमानुसार कारभार, कडक शिस्तीचे पण अजातशत्रू म्हणुन ओळखले जाणारे कृष्णराव हे शेवट पर्यंत खादीचे कपडे घालत असत.
मीरारोड - मीरा भाईंदर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजकारणा पेक्षा समाजकारणाला नेहमीच महत्व देत आलेले कृष्णराव गोविंदराव म्हात्रे यांचे आज रवीवारी वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. ते भाऊ म्हणुन परिचित होते. पारदर्शक व नियमानुसार कारभार, कडक शिस्तीचे पण अजातशत्रू म्हणुन ओळखले जाणारे कृष्णराव हे शेवट पर्यंत खादीचे कपडे घालत असत.
कृष्णराव यांचा जन्म ६ जानेवारी १९१८ साली भाईंदर गावात झाला. त्यांचे शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेतुन झाले. मुंबईच्या मोरारजी मिल मध्ये ते नोकरीला होते. स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीत ते सुरवाती पासुनच काँग्रेसशी जोडले गेले व अखेरच्या श्वासा पर्यंत कोणत्याही पदांची अपेक्षा न ठेवता ते काँग्रेस सोबतच राहिले. भाईंदर ग्रामपंचायतीचे ते १९६२ पासुन १९७१ दरम्यान सरपंच राहिले. तर १९७१ ते १९७५ दरम्यान ते पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य होते. अगदी गाव पातळीपासून लोकसभेसाठी काँग्रेसचा निवडणुकीतील उमेदवार कोण असावा यासाठी त्यांचा शब्द महत्वाचा असे.
भाईंदर मधील सर्वसामान्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणुन त्यांनी बंद पडलेली शाळा १९५९ साली पुन्हा सुरु केली. त्यावेळी दादरच्या छबिलदास शाळेच्या नाव आणि सहकार्याने सुरु केलेली व उभारलेली शाळा पुढे भाईंदर सेकंडरी झाली. भाईंदर शेतकरी शिक्षण संस्था संचालित ही शाळा आजही सर्वसामान्य कुटुंबातील मुला - मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान देत आहे. या शाळेतुन शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवुन आहेत. कृष्णराव विविध संस्थांचे मार्गदर्शक व आधारस्तंभ होते.
मीरा भार्इंदर शेतकरायांसाठी कृष्णराव यांनी भार्इंदर शेतकरी सोसायटी १९४८ साली स्थापन केली. शेतकरायां साठी स्थापन केलेल्या या संस्थे मार्फत नंतर नागरीकांना ना नफा ना तोटा तत्वावर रेशनचे धान्य मिळावे म्हणुन शिधावाटप केंद्र सुरु केली गेली. शेतकरायांच्या जमीनी समुद्राचे खारे पाणी शिरुन नापीक होऊ नये यासाठी त्यांनी बांध बंदिस्तीसाठी शासनाच्या खार बांधारे विभागाच्या माध्यमातुन बांध बंदिस्तीची कामे करुन घेतली. शहरातील शेतकरायांची संघटना बांधुन शेतकरायांसाठी लढा दिला. शेकरायांना सोबत घेऊन इस्टेट एनव्हेस्टमेंट विरुध्द आवाज उठवला. अगदी २००८ साली जिल्हाधिकारी झेंडे यांनी इस्टेटच्या बाजुने निकाल दिल्यावर कृष्णराव यांनी शेतकरी संघटने मार्फत पुन्हा वज्रमुठ उभारली होती.
त्याकाळी महिलांची प्रसुती ही घरच्या घरीच होत असे. त्यासाठी भार्इंदरच्या टेंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात १९६७ साली त्यांच्या प्रयत्नांनी महिलांसाठी २० खाटांचे शासकिय प्रसुतीगृह सुरु करण्यात आले. त्याकाळी भार्इंदरच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी १९६७ सालात शासना कडुन दिड दशलक्ष लिटर पाणी योजना मंजुर करुन सुरु केली. अनधिकृत बांधकामांचे माहेर घर म्हणुन ओळख झालेल्या मीरा भार्इंदर शहरा पैकी भार्इंदर पश्चिम मध्ये त्याकाळी जो नियोजनबध्द विकास झाला तो कृष्णराव यांच्या मुळे.
सरपंच असताना त्यांनी भार्इंदर पश्चिम गावच्या विकासाचा नियोजन आराखडा तयार केला. मोदी पटेल मार्ग, नारायण नगर या वसाहती रीतसर सर्व मंजुराया घेऊन अंतर्गत रस्ते आदिंचे नियोजन करुन उभ्या राहिल्या त्या कृष्णराव यांच्या मुळे. अनधिकृत बांधकामांना त्यांचा विरोध होता. त्यांच्या काळातील भार्इंदर पश्चिम व भार्इंदर पुर्व या दोन भागातील बांधकाम व नियोजनाच्या तुलने वरुन ते दिसुन येते. भार्इंदर फाटक येथील जुना पाण्याचा जलकुंभ असो वा ६० फुटी रस्ता देखील त्यांच्या नियोजनातला. मीरा भार्इंदर मध्ये ग्रुप ग्रामपंचायती त्यावेळी त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाल्या.
कृष्णराव यांनी राजकारणा पेक्षा गावाच्या हिताला व समाजकारणाला नेहमीच प्राधान्य दिले. शहराचे हित पाहुनच ते काम करायचे. कायदेशीर काम करण्यावर त्यांचा भर असे. कडक शिस्तीचे असलेल्या कृष्णराव यांनी त्या काळी पारदर्शक कारभारा केला. ते स्थानिक असले तरी गावात त्याकाळी वास्तव्यास आलेल्या गुजरात व राजस्थान मधील कुटुंबियांना देखील गावचे सरपंच, ग्राम सदस्य केले. त्यांना सोबत घेऊन सन्माना दिला. कोणाच्या जात, धर्म व प्रांताच्या आधारे त्यांनी भेदभाव केला नाही. बदलत्या राजकारण्यां सारखा स्वत:चा स्वार्थ आणि संधीसाधूपणा साधणे त्यांना कधीच जमले नाही.
वयाच्या १०२ व्या वर्षी देखील ते चालत - फिरत असत. प्रत्येकास नावाने ओळखत. गेले काही दिवस त्यांना न्युमोनियाने ग्रासले होते. फक साचला होता. त्यातुनच आज रवीवारी सकाळी ८ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सायंकाळी भार्इंदर स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी मच्छीमार नेते तथा शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते लिओ कोलासो, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा पालिका सभागृह नेते रोहिदास पाटील, माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरीक उपस्थित होते. कृष्णराव यांच्या पश्चात दिनार , पराग, भावना , भारती अशी चार मुलं तसेच नातवंडं असा मोठा परिवार आहे.