ज्येष्ठ साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:42 AM2021-01-08T01:42:38+5:302021-01-08T01:42:45+5:30
कॉलेज जीवनापासून त्यांचा लेखन प्रवास अविरत सुरू होता. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारदेखील त्यांना मिळालेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक कृष्णाजी ज. दिवेकर (कृ. ज. दिवेकर) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्यावर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मंदार, पत्नी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
कॉलेज जीवनापासून त्यांचा लेखन प्रवास अविरत सुरू होता. साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारदेखील त्यांना मिळालेला होता. तसेच ठाण्यामध्ये ८४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या ठाणे गुणिजन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ते सभासद होते. उत्कृष्ट लेखकाबरोबरच ते उत्तम वाचकही होते. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कथा संग्रह अशा एकूण ४०पेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे.
पोकळी निर्माण झाली
कृ. ज. दिवेकर अर्थात काका म्हणजे साहित्याचा सातत्याने वाहणारा झरा. काकांचे आणि माझे आमच्या वाचनाच्या छंदामुळे विशेष जमायचे. त्यांची लिखाण शैली आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिश्कील असा होता. काका आणि मी पत्र स्वरूपात गप्पा मारायचो, ते आता शक्य होणार नाही. माझे बाबा म्हणजेच नंदू जोशी यांच्या निधनानंतर दिवेकर काकांनी वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतली. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- केदार जोशी, सचिव,
ब्राह्मण शिक्षण मंडळ