RSS चे ज्येष्ठ स्वयंसेवक नरेंद्र चितळे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 04:05 PM2020-07-13T16:05:38+5:302020-07-13T16:06:37+5:30
अकोला आणि नागपूर येथे बालपण आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९४१ साली ते ठाणे येथे आले. टंकलेखक आणि लघुलेखक म्हणून एका सरकारी कंपनीत ते काम करत हो
ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषद आणि तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद गोपाळ चितळे यांचे वयाच्या अठ्याणव ( ९८) वर्षी वृद्धापकाळाने कर्जत येथे त्यांचा मुलीच्या निवासस्थानी रविवार १२ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समविचारी संघटनात ते बाळासाहेब या नावाने परिचित होते. नरेंद्र चितळे हे मूळचे विदर्भातील अकोला येथील होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२२ रोजी अकोला येथे झाला होता. नरेंद्र चितळे यांचे वडील रा.स्व. संघाचे अकोला जिल्ह्याचे संघचालक होते. घरातील वातावरणामुळे नरेंद्र चितळे यांचा ओढा रा.स्व. संघाकडे होता.
अकोला आणि नागपूर येथे बालपण आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९४१ साली ते ठाणे येथे आले. टंकलेखक आणि लघुलेखक म्हणून एका सरकारी कंपनीत ते काम करत होते. ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात ते सक्रिय होते. शाखा कार्यवाह, घोष प्रमुख अश्या जबाबदाऱ्या घेऊन काम करत असताना १९४८ साली आलेल्या पहिल्या संघ बंदीच्या विरोधात त्यांनी ठाण्यात सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहामुळे त्यांना सरकारी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. कारावासातून सुटल्यावर ते एका खाजगी कंपनीत काम करू लागले. निवृत्त होताना ते त्या कंपनीचे व्यवस्थापक होते. दरम्यान त्यांच्याकडे रा. स्व. संघाची ठाणे शहर कार्यवाह अशी जबाबदारी होती. १९७०च्या दशकात ते रा. स्व. संघाचे ठाणे विभाग कार्यवाह म्हणून कार्यरत होते. तत्कालीन जनसंघातही सक्रिय असणारे बाळासाहेब चितळे १९८० च्या दशकात रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे ठाणे विभाग प्रमुख होते.
ठाण्यातील रा. स्व. संघाच्या कामात बाळासाहेब चितळे यांचे दीर्घकाळ योगदान राहिले आहे. गेली काही वर्षे ते कर्जत येथे आपल्या मुलीकडे रहात होते. स्वयंसेवकांना भेटण्यासाठी ते ठाण्यात आवर्जून येत असत. रा. स्व. संघाच्या गुरुपूजनाच्या उत्सवाचे समर्पण ठाण्यातील शाखेत करण्यासाठी ते आग्रही होते. कर्जत होऊन ते त्यासाठी कटाक्षाने येत असत. गेली काही वर्षे त्यांची दृष्टी अंधूक झाली होती. परंतु, रोजची वर्तमानपत्र ते वाचून घेत असत. बाळासाहेब चितळे यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली आणि परिवार आहे. ठाण्यातील जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक दिनकर दामले यांचे हे बाळासाहेब चितळे हे मामा होते.