भाजपाच्या सिंधी मतांवर सेनेचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:02 AM2018-05-19T04:02:43+5:302018-05-19T04:03:04+5:30
डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतांची बेगमी आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तीन विधानसभा मतदारसंघांची तयारीच शिवसेनेने यानिमित्ताने सुरू केल्याचे मानले जाते.
उल्हासनगरात तब्बल साडे चारलाख मतदार आहेत. यातील अर्धेअधिक मतदार सिंधी भाषक असून लोकसभा आणि तीन विधानसभांसाठी ते निर्णायक ठरणारे आहेत. शहरातील कॅम्प नं- १, २ आणि ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप या गावांचा समावेश उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात होतो. कॅम्प नंबर ४ व ५ परिसरातील एक लाख ४० हजार मतदार अंबरनाथ विधानसभा; तर कॅम्प नंबर ४ परिसरातील ४० हजार मतदार कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा आणि तीन विधानसभेतील सिंधी मतदार डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
सध्या भाजपात आयलानी विरूद्ध कलानी असा संघर्ष तापला आहे. त्यातही निर्णायक ठरणारा साई पक्ष संभ्रमावस्थेत असला, तरी शांत आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७० टक्के मतदार सिंधी भाषिक आहेत. शिवसेनेने सिंधी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास सिंधी, मराठी आणि इतर मतदार एकत्र यतील, अशी शिवसेनेची गणिते आहेत.
उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने सिंधी भाषक उमेदवार दिल्यास त्याचा फायदा अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघांना होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहित धरल्याची चर्चा आहे.
पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणातील बांधकामांबाबत तात्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. यातूनच अवैध बांधकामांना पाठीशी घालण्याचा आरोप ठेवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द का करून नये? अशी नोटीस बजावली होती. भाजपापेक्षा शिवसेना सिंधी व्यापाºयांच्या मदतीला धावून आली, असा त्याचा परिणाम झाला आणि सिंधी व्यापाºयांशी शिवसेनेचे नाते जोडले गेले. त्यातही ठाकरे यांच्या सभेत सिंधी संतांचा सत्कार करून शिवसेनेने धार्मिकदृष्ट्या सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.
।भांडणामुळे नाराजी
कलानी-आयलानी या दोन कुटुंबातील लढतीत सिंधी समाज दोन गटात विभागला गेला. दोघांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सिंधी समाजातही स्थलांतराचे प्रमाण वाढले, अशा प्रकारची माहिती समोर येऊ लागली. त्याचा फायदा शिवसेनेने उचलला. आयलानी आणि कलानी नको, असे म्हणणाºयांची संख्या वाढली आहे.