सेनेच्या निर्मला माखिजा पुन्हा स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:42 AM2017-08-12T05:42:00+5:302017-08-12T05:42:00+5:30
मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या पहिल्या महिला आघाडीप्रमुख निर्मला माखिजा यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील शिवसेनेच्या पहिल्या महिला आघाडीप्रमुख निर्मला माखिजा यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. परंतु, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे त्या पुन्हा स्वगृही परतल्या.
माखिजा या शहरातील एका नामांकित शाळेच्या संस्थापिका आहेत. एकेकाळी सेनेचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्या त्या कट्टर समर्थक मानल्या जायच्या. माखिजा यांनी नाईक यांच्यासोबत राष्टÑवादीत प्रवेश केला होता. स्थानिक पातळीवर त्यांना महत्त्वाचे पद असतानाच राष्टÑवादीतून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपल्या शाळेला मालमत्ताकरात सवलत मिळावी, यासाठी पालिकेकडे त्या पाठपुरावा करत होत्या.
पालिकेने राजकीय वजन असलेल्या काही शाळांना २५ टक्के गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याच्या अटीवर मालमत्ताकरात सुमारे ५० टक्के सवलत दिली. हा फायदा आपल्याही शाळेला मिळावा, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्याला प्रशासनाने दाद न दिल्याने ते काम करून देण्यासह यंदाच्या पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर त्या भाजपात दाखल झाल्या होत्या. त्यांनी भाजपातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतानाच भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांचा अपेक्षाभंग केला. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी अखेर स्वगृही परतणे पसंत केले.
खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे दीपा भारद्वाज यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतला.
आदित्य ठाकरेंचा आज रोड शो
पालिका निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळवून देण्यासाठी उद्या सकाळी १० वाजता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. रोड शो ला घोडबंदर मार्गावर असलेल्या चेना गाव येथून सुरूवात होणार आहे. पुढे तो काशिमिरा वाहतूक बेट मार्गे मीरा रोड, भार्इंदर पूर्व व पश्चिम येथून पुन्हा काशिमिरा वाहतूक बेटमार्गे दहिसर चेकनाका येथे समारोप होईल.
यासाठी सेनेचे सुमारे १० हजाराहून अधिक कार्यकर्ते या रॅलीत दुचाकीद्वारे सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
तसेच सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व उमेदवार या रोड शोमध्ये हजेरी लावणार आहेत. दुपारी २ वाजता रोड शो संपेल अशी माहिती सूत्रांनी दिली.