'हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा!', रामदास कदमांकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:55 PM2022-07-22T23:55:01+5:302022-07-22T23:55:48+5:30
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले.
ठाणे : हकालपट्टी करण्याचा सपाटा शिवसेना नेतृत्वाकडून सुरू आहे. यावरुन नुकतेच शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल झालेल्या रामदास कदम यांनी हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, असा टोला लगावत एकप्रकारे शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे. तसेच, बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पाहायला मिळाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि दुसरा उद्धव ठाकरे यांचा गट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील आमदार खासदार तसेच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची देखील हाकालपट्टी याच कारणामुळे करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी भावनिक होऊन शिवसेने साठी एवढे वर्ष कार्य करून केलेली हकालपट्टी चुकीची असल्याचे माध्यमांच्या समोर सांगितले. शिवसेनेकडून केलेला हकालपट्टीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा रामदास कदम यांना शिवसेना नेते पदाची धुरा सोपवली आहे. त्यातच शुक्रवारी रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेण्यासाठी आलेले आहेत.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे यावेळी रामदास कदम यांनी सांगितले. तर एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात असून अनेक कार्यकर्ते शिंदे गटाकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी वेगळी समिती नेमावी अशी खोचक टीका करत रामदास कदम यांनी सल्ला दिला. तर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देखील यावेळी रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आले.