ठाण्यात खासगी हॉटेलमध्ये होता येणार विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:08+5:302021-04-24T04:41:08+5:30
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास वेळ प्रसंगी हॉटेलही आयसोलेशन सेंटर म्हणून ताब्यात घेऊ, असे सुतोवाच जिल्ह्याचे ...
ठाणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास वेळ प्रसंगी हॉटेलही आयसोलेशन सेंटर म्हणून ताब्यात घेऊ, असे सुतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने लक्षणे नसलेल्या स्वत:च्या खर्चाने खासगी विलगीकरण कक्षात तपासणी आणि उपचार घेण्याची तयारी असणाऱ्या रुग्णांकरिता हॉटेल कॅपिटल हे आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित केले आहे. यासाठी प्रतिदिन दरही निश्चित केल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.
या हॉटेल्सची रचना कोविड -१९ आयसोलेशन सेंटर म्हणून चार भागात केलेली असून, एकूण २५ खोल्या असलेल्या या हॉटेलमध्ये व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे अनुभवी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यासह आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये दोन हजार इतका दर निश्चित केला असून, यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार आहे.