केडीएमसीचा सिक्वेल आता ठाण्यात
By admin | Published: October 21, 2016 04:27 AM2016-10-21T04:27:30+5:302016-10-21T04:27:30+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली
- अजित मांडके, ठाणे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची ताकद भाजपाच्या शक्तीपेक्षा कितीतरी अधिक असल्याने आपले संख्याबळ टिकवून ठेवणे व काही प्रमाणात वाढवणे, हेच शिवसेनेचे लक्ष्य आहे, तर तोळामासा प्रकृतीच्या भाजपाचा सत्ता स्थापनेपेक्षा आपले संख्याबळ जेवढे वाढवता येईल, तेवढे वाढवणे हाच हेतू आहे. त्यामुळे शेजारील कल्याण-डोंबिवली महापालिकेतील संघर्षाचा आणि निकालाचा सिक्वेल ठाण्यात मतदारांना पाहायला मिळणार आहे.
ठाणे हे वर्षानुवर्षे शिवसेनेचेच असल्याने भाजपाने आतापर्यंत या शहरातील संघटनेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मोदीलाटेच्या जोरावर लोकसभा आणि विधानसभेत भाजपाने ठाण्यात जोरदार मुसंडी मारल्याने आता शिवसेनेच्या मैदानात पाय रोवण्याची हीच संधी असल्याचे भाजपाला वाटते.
विधानसभेतील यशाचा फायदा पालिका निवडणुकीत होईल, असा कयास होता. परंतु, आरक्षण सोडत जाहीर झाली आणि सोडतीचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असा भीतीचा गोळा भाजपाच्या पोटात आला. त्यामुळे युतीसाठी काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. परंतु शिवसेनेनेच स्वबळावर लढण्याची भाषा केल्याने भाजपाची पंचाईत झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेकडे २४ जागा मागितल्या होत्या. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना २२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यापैकी ८ नगरसेवक विजयी झाले.
शिवसेनेने आधीपासून स्वबळाची मोर्चेबांधणी केली आहे. चार वॉर्डांचा मिळून एक पॅनल असल्याने त्याचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असे सध्याचे तरी चित्र आहे. स्वबळाचा निर्णय लादला गेलाच तर विधानसभेच्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावण्याची तयारी भाजपाने केली आहे. जुने ठाणे, घोडबंदरचा काही पट्टा, कोपरी, वागळेतील काही भाग, टेंभीनाका, जांभळीनाका, नौपाडा आदींसह इतर भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाला आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांचा स्वबळाचा नारा ठाण्यात भाजपाची दमछाक करण्याची शक्यता अधिक आहे.
शिवसेनेचा गड खेचण्याचा होता विचार
ठाणे शहर मतदारसंघाते भाजपाला ७० हजार ८८४ मते तर, शिवसेनेला ५१ हजार १० मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यात ७२८६ मतांची वाढ जरी झाली असली तरी वाढलेल्या मतदारांपुढे ही वाढ फारच कमी आहेत. कोपरी-पाचपाखाडीत शिवसेनेला १ लाख ३१६ मते मिळाली, तर भाजपाने येथे ५० हजारांची आघाडी घेतली होती. ओवळा-माजिवडामध्ये शिवसेनेला ६५ हजार ५७१ मते तर भाजपाला ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. कळवा-मुंब्रामध्ये शिवसेनेला ३८ हजार ८५० मते पडली होती. तर, भाजपाला १२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळेच २९ वर्षे शिवसेनेकडे असलेला ठाण्याचा गड आपल्याकडे खेचण्याचा विचार भाजपाचा होता.