गंभीर गुन्ह्यांच्या नोंदीचे पोलिसांना वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:52+5:302021-07-09T04:25:52+5:30
कल्याण : एकीकडे ठाणे पोलिसांच्या कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत हत्या, बलात्कार, आत्महत्या, अपघाती मृत्यू आदी गंभीर गुन्हे गेल्या काही ...
कल्याण : एकीकडे ठाणे पोलिसांच्या कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत हत्या, बलात्कार, आत्महत्या, अपघाती मृत्यू आदी गंभीर गुन्हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असताना दुसरीकडे पत्रकारांना वृत्तांकनासाठी पाठविल्या जाणाऱ्या दैनंदिन क्राइम रिपोर्टमध्ये अशा गुन्ह्यांची नोंदच होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यातून माहिती घ्या, असे सांगितले जाते. तर स्थानिक पोलिसांकडून नियंत्रण कक्षाकडे बोट दाखविले जात असल्याने पत्रकारांची परवड होत आहे.
सध्या कल्याण-डोंबिवलीत वाहनचोरी, ऑनलाइन फसवणूक, बतावणी करीत गंडा घालणे, घरफोडी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांची नोंद क्राइम रिपोर्टमध्ये होते; परंतु गंभीर गुन्ह्यांची नोंद होत नाही. दरम्यान, याआधी सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद क्राइम रिपोर्टमध्ये होत असते. एखाद्या गुन्ह्याचा छडा लागल्यावर त्यासंदर्भात पत्रकार परिषदा घेऊन त्यासंदर्भात माहिती दिली जाते; परंतु गुन्हा घडताच त्याची नोंद क्राइम रिपोर्टमध्ये करून पत्रकारांना माहिती देण्याबाबत पोलिसांना सध्या असलेले वावडे पाहता ही लपवाछपवी चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचबरोबर दररोज क्राइम रिपोर्ट मिळणे अपेक्षित असताना तो दोन ते तीन दिवसांनी उशिरानेही मिळत आहे.
------------------------------------