केडीएमसीतील दोन प्रभागांत आता होणार ‘सेरो’ सर्वेक्षण; केंद्र सरकारची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:58 AM2020-08-26T00:58:58+5:302020-08-26T00:59:25+5:30
आरोग्य विभागाची तयारी सुरू, ५० लाख नागरिकांची प्रतिकारशक्ती ही कोरोनावर मात करणारी ठरली. त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील हॉटस्पॉट असलेल्या क्रांतीनगर आणि आनंदवाडी येथे केंद्रीय आरोग्य पथकाने सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपाने पाठविला होता.
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट असलेल्या दोन प्रभागांमध्ये सेरोलॉजिकल सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे त्यातून किती टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे; तसेच ते कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत, याची माहिती पुढे येऊ शकते.
केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यामुळे मनपाने कोरोना रुग्ण शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी तापाचे दवाखाने, थर्मल स्कॅनिंग, घरोघरी जाऊन सर्वेक्षण अशा विविध उपाययोजना केल्या. सुरुवातीला मनपा हद्दीत कोरोनाचे १० हॉटस्पॉट होते. मात्र, हळूहळू ही संख्या ४७ पर्यंत पोहोचली. ही सगळी हॉटस्पॉटची ठिकाणे दाट लोकवस्ती व झोपडपट्टी विभागातील होती.
जुलैमध्ये कोरोना रुग्णांची एका दिवसातील संख्या ६३१ पर्यंत गेल्यानंतर मनपाने पुन्हा १७ दिवसांचा लॉकडाऊन घेत विविध उपाययोजना सुरू केल्या. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मात्र अद्याप ही संख्या कमी होत नाही. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट क्षेत्रातही आता नवीन रुग्ण आढळलेले नाहीत. मुंबई मनपाने केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून मुंबईतील ५० लाख नागरिकांना कोरोना होऊन गेला; तसेच त्यांनी त्यासाठी कोणतेही उपचार केले नसल्याचीही बाब पुढे आली.
किती जणांना कोरोना झाला ते होईल स्पष्ट
५० लाख नागरिकांची प्रतिकारशक्ती ही कोरोनावर मात करणारी ठरली. त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील हॉटस्पॉट असलेल्या क्रांतीनगर आणि आनंदवाडी येथे केंद्रीय आरोग्य पथकाने सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपाने पाठविला होता. त्याला केंद्राची मान्यता मिळाली आहे. आता या सर्वेक्षणाची तयारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. मनपाने प्रातिनिधिक स्वरूपात दोन प्रभाग निवडले आहेत. या दोन प्रभागांतील लोकसंख्येच्या आधारे मनपा हद्दीतील किती लोकांना कोरोना होऊन गेला आहे, याची माहिती पुढे येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.