ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून सव्वा कोटींचे दागिने चाेरणाऱ्या नोकराला माऊंट अबूमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:01 PM2024-06-10T19:01:04+5:302024-06-10T19:01:18+5:30
एक कोटी दहा लाखांचे दागिने हस्तगत: नौपाडा पोलिसांची कामगिरी
जितेंद्र कालेकर, ठाणे: ठाण्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एका कोटी ३० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करणाºया त्याच दुकानातील विशालसिंग कानसिंग राजपूत (२९) या नोकराला माऊंट अबू पर्वताच्या जंगलातून अटक केल्याची माहिती नाैपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून एक कोटी २६ लाखांचे एक हजार ७४५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
‘विरासत ज्वेलर्स’ या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात आॅफिस बॉय म्हणून काम करणारा विशालसिंग हा दुकानातील एक कोटी ३० लाख १४ हजारांचे दागिने घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पुनमिया यांनी ११ मे २०२४ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यातील संशयित आरोपी हा विशालसिंग हा त्याच्या मुळ गावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुळ गावचा पत्ता कळू नये यासाठी त्याने दुकानात दिलेले आधारकार्डसह इतर दस्तावेज साेबत घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे आणि उपनिरीक्षक दत्तात्रय लोंढे यांच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी घटनेच्या दिवशी तो दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक ठिकाणच्या सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यात त्याने पळून जातांना आठ ते दहा वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचे व तो वसई रोडकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले.
पुरावा नष्ट करण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये टाकून तो अहमदाबादकडे बसने पसार झाला. याच काळात जैयसलमेर, पालनपूर, जोधपूर, जयपूर आणि माऊंटअबूपर्यंत वेगवेगळया ठिकाणी रात्रीच्या वेळी फिरुन पोलिसांना गुंगारा देत होता. तो राजस्थान मधील माउंट आबू येथे लपल्याची माहिती तपास पथकाला २ जून २०२४ रोजी मिळाली. त्याच आधारे नौपाडा पोलिसांचे एक पथक त्वरित माउंट आबु येथे गेले. सखाेल चाैकशीमध्ये तो जंगलात लपल्याची माहिती या पथकाला मिळाली. पोलिसांनी जंगलात वेषांतर करून त्याच्यावर पाळत ठेवून अखेर ताे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला ७ जून रोजी पाठलाग करुन अटक केली. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून एक कोटी २६ लाखाचे दागिने जप्त केले. त्याला १२ जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.