निष्ठावंत शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र; सामुदायिक राजीनाम्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:09 AM2019-07-11T00:09:37+5:302019-07-11T00:09:39+5:30
शिवसेनेमधून चार वेळा निवडून आलेले व दोनवेळा हार पत्करावी लागलेले माजी आमदार दौलत दरोडांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शहापूर/वासिंद : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत सोगाव, साकडबाव गटातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते भास्कर भोईर, नामदेव हरणे, शेणवा विभागप्रमुख अशोक कुडव, शिवसेना सहकार उपतालुकाप्रमुख हरिभाऊ शिंदे, माजी सरपंच बबन केव्हारी, कुलदीप धानके आदींनी सामुदायिक राजीनामा देण्याचा निर्णय घेणारा ठराव मंजूर केला.
बैठकीत एकनाथ शिंदे आणि तालुकाप्रमुख मारु ती धिर्डे यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या पडत्या काळात दरोडा यांनी पक्षाला भक्कम साथ दिली होती. आता त्यांना डावलून बरोरा यांना उमेदवारी देणे आम्हाला मान्य नाही. शिवसेनेत दौलत दरोडा, चंद्रकांत जाधव, गजानन गोरे, ज्ञानेश्वर तळपाडे, मंजूषा जाधव हे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्यापैकी एकाचा विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी सगळ्यात जास्त जागा मिळूनही भाजपचे खा. कपिल पाटील यांना शह देण्यासाठी शहापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले. त्यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर राडा केला होता. तो असंतोष खदखदत असतानाच आता निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्यामुळे काही शिवसैनिक बंडखोरीच्या तयारीत आहेत.
राजकीय अस्तित्वावर ‘दरोडा’
शिवसेनेमधून चार वेळा निवडून आलेले व दोनवेळा हार पत्करावी लागलेले माजी आमदार दौलत दरोडांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बरोरा यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे दरोडांची कोंडी झाली आहे. शिवसेना पक्षश्रेष्ठींकडून दरोडा यांचे पुनर्वसन केले जाणार की, त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
पवार-शिवसेना संघर्ष जुनाच
शहापूर विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसला पुलोद सरकारच्या काळात महादू बरोरा यांच्या रूपाने आमदार लाभला. त्यानंतर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे यांनी शहापुरात लक्ष घालून निष्ठावान शिवसैनिकांची मोठी फळी उभी केली. शिवसेनेचे नेते रमेश अवसरे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, रमेश जगे, अशोक बांदेकर, चंद्रकांत जाधव, मंजूषा जाधव, रश्मी निमसे अशा अनेकांची साथ दिघे यांना लाभली. याच निष्ठावान शिवसैनिकांनी शाखा सुरू केल्या. दिघे यांची शिस्त आणि निष्ठावान शिवसैनिकांची फळी यामुळेच १९८५ मध्ये दौलत दरोडा यांच्यासारखा कमी वयाचा उमेदवार निवडून आणून शिवसेनेने पवार यांना शह दिला. तेव्हापासून शहापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस (नंतर राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात काँटे की टक्कर होत आली. शिवसेनेचे दरोडा तीनवेळा निवडून आले. आगामी विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत दरोडा होते. तेवढ्यात, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेत बरोरा यांना आपल्या तंबूत घेतले.
आपल्यासमवेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, सेवा सहकारी संस्था, खरेदीविक्र ी संघ, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, सरपंच, उपसरपंच इतर पदाधिकारी यांच्यासह ५० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत दाखल होतील, असा दावा केला. बरोरा यांच्या शिवसेनाप्रवेशास त्यांचे काका खंडू बरोरा आणि चुलतभाऊ आणि आटगाव ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर बरोरा यांचा विरोध झाला. नंदकुमार मोगरे, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, राष्ट्रवादीचे गटनेते, विनोद भोईर, खंडू बरोरा, सुभाष पाटील, सोनू पडवळ, दत्तात्रेय पाटील, बबन सातपुते आदींनी बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेत आम्ही पक्षात राहणार असल्याची ग्वाही दिली.
पांडुरंग बरोरा यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. असे असतानाही इतर पक्षात प्रवेश करणे, ही खेदाची बाब आहे.
- दशरथ तिवरे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस