"अरुंद वस्तीतील आग विझवणारी यंत्रणा आधी उभारा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:53 AM2021-02-08T00:53:56+5:302021-02-08T00:54:13+5:30
संतप्त नागरिकांची मागणी
भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत तब्बल १७ कोटी खर्चून ६८ मीटरपर्यंत पोहचणारी अग्निशमन दलासाठी परदेशी वाहन खरेदी केले आहे. हे वाहन बिल्डरांना उंच इमारतीच्या परवानगी मिळाव्यात यासाठी खरेदी केल्याचा आरोप करत आधी अरुंद वस्तीत लागणाऱ्या आगी विझवण्याची यंत्रणा उभारा असा संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी महापालिका आणि सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत ६८ मीटर उंचीपर्यंत जाणारी टर्न टेबल लॅडर ही परदेशी बनावटीची अग्निशमन गाडी १७ कोटींना खरेदी केली. ही गाडी खरेदी करणारी मीरा- भाईंदर ही देशातील पहिली महापालिका असल्याचा टेंभाही मिरवण्यात आला. परंतु शहरातील गाव परिसर व अरुंद भागात आग लागल्यास ती विझवण्यासाठी मात्र महापालिकेकडे आजही यंत्रणा नसल्याने १७ कोटींची गाडी कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक करत आहेत. भाईंदरच्या उत्तन परिसरात वेलंकनी तीर्थमंदिराजवळ असलेल्या डोंगरावर नुकतीच मोठी आग लागली. परंतु ही आग विझवण्यासाठी उत्तन अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन घटनास्थळी घेऊन जाण्यास अरुंद रस्त्यांमुळे विलंब झाला.
अग्निशमन दलाच्या वाहनास पोहचण्यास विलंब लागल्याने आग वेगाने पसरली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरावरील झाडे झुडपे नष्ट झाली. या ठिकाणी स्थानिकांसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
शहरातील अरुंद ठिकाणी वसाहतीमध्येही अनेकवेळा अग्निशमन वाहने पोहचण्यास विलंब होतो जेणेकरून आगीची तीव्रता वाढून नागरिकांचे जास्त नुकसान होते. परंतु जुने मीरा- भाईंदर शहर, गावठाण, औद्योगिक वसाहती तसेच उत्तन परिसरात रस्ते अरुंद असल्याने आग लागल्यास वा आपत्ती आल्यास अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचू शकत नाही.
त्यामुळे अशा अरुंद परिसरातील नागरिकांच्या बचाव व सुरक्षे साठी लहान आकाराची अग्निशमन वाहने तसेच अन्य पर्यायी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.
तसे असताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपला मात्र बिल्डरांना अतिशय उंच इमारतींच्या परवानगी मिळावी आणि त्यांना खूष ठेवता यावे म्हणून हे वाहन खरेदी केले. परंतु गावठाण, जुन्या शहरातील अरुंद वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र लहान अग्निशमन वाहने व पर्यायी यंत्रणेसाठी खर्च करण्याची दानत मात्र नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केला आहे. नागरिकांनी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
लहान वाहनासाठी सतत मागणी
उत्तन परिसरासाठी लहान आकाराची अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची पालिकेकडे सतत मागणी करूनही पालिका व सत्ताधारी यांना मात्र नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे सोयरसूतक नाही असे गंडोली यांनी सांगितले.