सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारा; शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:11 PM2021-08-07T22:11:50+5:302021-08-07T22:12:08+5:30
मीरारोड - देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणी - तरुणां करीता मीरा भाईंदर शहरात मार्गदर्शन केंद्र उभारण्याची इच्छा ...
मीरारोड - देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणी - तरुणां करीता मीरा भाईंदर शहरात मार्गदर्शन केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त करत शहिदांची स्मारकं उभारा , परंतु नंतर त्याचे पावित्र्य राखण्यासह स्वच्छता, देखभाल ठेवा अशी सूचना शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे यांनी केली .
७ ऑगस्ट २०१८ रोजी काश्मीर येथे सीमेवर अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे मीरारोडचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे सह सहकारी जवान शहीद झाले होते . आज शनिवारी मेजर कौस्तुभ यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने मीरारोडच्या कनकिया भागात महापालिका उद्यानात शहीद स्मारकाचे भूमिपूजन आई ज्योती व वडील प्रकाशकुमार राणे व कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आमदार प्रताप सरनाईक , आयुक्त दिलीप ढोले , विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील , गटनेत्या नीलम ढवण , नगरसेवक राजू भोईर , भावना भोईर , कमलेश भोईर , तारा घरत , अर्चना कदम , वंदना पाटील , संध्या पाटील , शर्मिला गंडोली , स्नेहा पांडे , अनंत शिर्के , जयंतीलाल पाटील , धनेश पाटील , कुसुम गुप्ता सह शिवसेना पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे , विक्रम प्रतापसिंग , शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , प्रशांत पलांडे आदी उपस्थित होते .
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी 'शहीद स्मारक' उभारण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न चालवले होते. त्यांच्या विशेष निधीतून १ कोटी खर्चून स्मारक तयार केले जाणार आहे. या शहीद स्मारकाच्या मधोमध जी ज्योत (मशाल) असेल ती २४ तास तेवत राहणार आहे. स्मारकाचे काम सुरु झाले असून कौस्तुभ राणे यांच्या जन्मदिन २७ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांचे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने रोज स्मरण केले पाहिजे . या शहीद स्मारक व अन्य सर्व स्मारकांचे पावित्र्य ठेवणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्मारक परिसरात नियमित स्वछता व देखभाल व्हावी अशी अपेक्षा ज्योती राणे यांनी व्यक्त केली.
या स्मारकातुन तरुणांना प्रेरणा मिळेलच. प्रत्येक जण सैन्यात जाऊ शकत नाही परंतु देशहितासाठी विधायक कार्य करण्याचा संकल्प प्रत्येकाने करून आदर्श नागरिक बनावे, या स्मारकातून आपल्याला त्यासाठी प्रेरणा मिळेल असे ज्योती राणे म्हणाल्या.
तरुणांना सैन्य भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी एखादी वास्तू उभी करून तेथे पूर्णवेळ मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशी सूचना ज्योती व प्रकाशकुमार राणे यांनी यावेळी केली. त्यावर भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनचे काम सुरु असून त्या इमारतीत कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी एक दालन तसेच आवश्यक पुस्तके व मार्गदर्शक उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आ . सरनाईक यांनी दिले .