महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:46 AM2018-08-20T03:46:01+5:302018-08-20T03:46:28+5:30
गर्दीच्या ठिकाणी १२ तास घालणार गस्त, आलेल्या तक्रारी सोडवणार
मीरा रोड : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून मीरा- भार्इंदर महिलापोलिसांचे निर्भया पथक स्थापन झाले आहे. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.
शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून शारीरिक शोषणाचे गुन्हे घडतात. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही या विद्यार्थीनींना तरूणी व महिलांना छेडछाड, लगट आदी अनुभव येत असतात. नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही वाढीस लागलेले आहेत.
महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून पोलिसांची निर्भया पथके स्थापन केली जात आहेत. मीरा- भार्इंदर शहरासाठीही निर्भया पथक तैनात केले असून मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग, निरीक्षक सुरेश गेंगजे व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निर्भया पथक स्थापन करण्यात आले.
या पथकासाठी स्वतंत्र वाहन दिलेले आहे. शहरातील शाळा, महाविद्याल, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान गस्त घालणार आहे. या पथकासोबत दोन पुरुष पोलीस देण्याचा विचार सुरु आहे. पोलीस मुख्यालयातून या पथकासाठी महिला अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून त्या नंतर पथक २४ तास सक्रिय असेल असे कुलकर्णी म्हणाले.
विद्यार्थीनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेट्या व त्यातील तक्रारी हे पथक हाताळणार आहे.
या पथकासाठी लवकरच हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. जेणेकरुन अडचणीच्यावेळी पोलिसांची तातडीची मदत मिळेल असे कुलकर्णी यांनी सांगितले.
याद राखा छेड काढाल तर...
मुली, महिलांची छेड काढाल तर याद राखा असा सज्जड दम देणारे फलकच नवघर पोलिसांनी तयार केले आहेत. छेड काढाल तर जेलमध्ये जाल. पण त्याचबरोबर नोकरी, सरकारी नोकरी व पासपोर्टही गमवाल. नवघर पोलिसांनी मुली, महिलांसाठी ७७७७००४५३५ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे.