तरूणांमध्ये वाचन संस्कृती रूजावी म्हणून ठाण्यात कोमसापने केली वाचक-मंचाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:42 PM2017-12-23T15:42:52+5:302017-12-23T15:50:52+5:30
तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कोमसाप ठाणे शाखेने आम्ही पण वाचतो हा अभिनव उपक्रम सुरु केला आणि या उपक्रमाची नुकतीच सुरुवात हि करण्यात आली.
ठाणे: वाचन संस्कृती तरूणांमध्ये रूजावी आणि ती वाढावी हा सकारात्मक उद्देश मनात धरून कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेने वाचक- मंचाची स्थापना केली. दर तीन महिन्यांनी वाचक मंचाचा कार्यक्र म होणार असल्याचे यावेळी कोमसापने जाहीर केले. जास्तीत जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोमसापने केले आहे.
या निमित्ताने एक नवीन उपक्र म हाती घेण्यात आला. आपण काय वाचले, मग ती कथा, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, काव्यसंग्रह आणि इतर ललित लेखन यापैकी काहीही असो, वक्त्याने साधारण पाच मिनिटात त्या साहित्याचे रसग्रहण म्हणा, विवेचन म्हणा श्रोत्यांसमोर सादर करावयाचे आहे. या श्रुंखलेतील पहिले पुष्प ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाले. या कार्यकमास विशेष अतिथी म्हणून विवेक मेहेत्रे, ठाणे लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, ज्येष्ठ कवी डॉ महेश केळुस्कर व कवी शशिकांत तिरोडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जेष्ठ समीक्षक डॉ अनंत देशमुख यांनी भूषिवले. यावेळी कोमसाप ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात उपक्र माचे उद्दीष्ट थोडक्यात विशद केले. त्यानंतर नंदकुमार टेणी व विवेक मेहेत्रे यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले. विवेक मेहेत्रे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे चित्रकार लेखक हे स्वत: कार्यक्र मास उपस्थित होते आणि त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी आपल्या भाषणात काय वाचावे, कसे वाचावे याचा सोदाहरण उहापोह केला.
तदनंतर उपस्थितांपैकी बारा वक्त्यांनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर भाष्य केले. तसेच ते पुस्तक जरूर वाचावे असे आवाहन श्रोत्यांना केले. विविध वक्त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, व.पु.काळे, पु. ल., दुर्गा भागवत असे कितीतरी विषय हाताळले. सुत्रसंचालन करताना नीता माळी व साधना ठाकूर यांनी कार्यक्र माची लयबद्धता चांगली राखली. सदानंद राणे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्र माची सांगता झाली.
कोमसापच्यावतीने वाचन संस्कृती टिकविण्यासाठी आणि वाचकाचे पुस्तकाशी असलेले नाते जाणून घेण्यासाठी ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची सुरूवात नुकतीच झाली. वाचकांना पाच मिनीटाच्या कालावधीत कथा, कादंबरी, चरित्र यापैकी कुठल्याही एका साहित्य प्रकारावर आधारीत पुस्तकावर बोलण्याची संधी दिली जाणार आहे असे मेघना साने यांनी सांगितले.