‘भिवंडीच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर तोडगा काढा’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:47 AM2019-05-09T00:47:08+5:302019-05-09T00:47:31+5:30
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली.
- रोहिदास पाटील
अनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली. या पाणी टंचाईचे पडसाद भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील, सदस्य प्रकाश भोईर यांनी गाजवला. तर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरल्याने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक बुधवारी बोलावली. या बैठकीत पाणीप्रश्न पेटला. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावपाड्यातील पाणी टंचाईचा पाढाच वाचला. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत माहिती दिली. लोनाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बापदेव पाडा येथील पाणी टंचाई संबंधी ‘खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची आली वेळ’, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाºयांच्या तोंडचे पाणी पळाले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी पाड्यास भेट दिली आणि तेथे बोरवेल मारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. स्वाती खाण यांनी दिली. तर मैदे येथील बातरेपाडा, हरेपाडा, रावते पाडा येथील पाण्याचा प्रश्न ‘लोकमत’मधील बातमीमुळे मिळाल्याचे आ. मोरे यांनी सांगितले.
या बैठकीत पाणी टंचाई संबंधी ग्रामसेवकांनी माहिती दिली. त्यावर आक्र मक होत कारणे सांगू नका, गावपाड्यातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम ग्रामसेवकांचे आहे. ग्रामसेवकांनी आपले गाव समजून जर काम केले तर पाणीटंचाई निर्माणच होणार नाही, आणि टंचाईबाबत बैठका घेण्याची वेळच येणार नाही, असे सांगून पाणीपुरवठा विभागाने गावपाड्यातील टंचाईचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून पंधरा दिवसांत पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना आ. शांताराम मोरे यांनी सभेत दिले आहेत.
पाणीटंचाईसह आदिवासींसह नागरिकांना भेडसावणाºया समस्या मांडून त्या दूर करण्याची मागणी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी अधिकाºयांकडे केली आहे. त्या न सोडवल्यास संघटना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.
टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. त्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. पाण्यासाठी बैठका घेण्याची वेळ येऊच नये, असे भिवंडी पंचायत समिती सभापती रवीना जाधव यांनी सांगितले. तसेच नादुरूस्त बोरवेल दुरूस्त करा, नवीन बोरवेल मारून टंचाई दूर करा असेही त्या म्हणाल्या. ‘लोकमत’मुळे आम्हाला ही टंचाईची माहिती मिळते, यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, सुदेश भास्करराव यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कवाड येथील तलावाचा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र काबाडी यांनी केली. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले. सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या बैठका घेऊन टंचाईवर मात करणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के म्हणाले.
लोकमतचे मानले आभार
पाणीटंचाई संबंधी दोन वर्षांपासून सातत्याने सचित्र ‘आँखो देखा हाल’ ‘लोकमत’ने जनतेसमोर आणला. यामुळे झोपी गेलेले प्रशासन जागे झाले. त्यामुळे गावपाड्यातील गरीब, कष्टकºयांना पाणी मिळते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी, सभापतींनी ‘लोकमत’चे आभार मानले.