अवघ्या ४ दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलन; एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या रक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 08:33 PM2021-10-11T20:33:00+5:302021-10-11T20:33:16+5:30
संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यातून रक्तदात्यांचा ठाण्यात ओघ
ठाणे- ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथळ शिंदे यांच्या संकल्पनेतून, नवरात्रीचे औचित्य साधून ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सोमवारी सलग चौथ्या दिवशी १५०० हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. शुभारंभाच्या दिवशी, शुक्रवारी २३३७, शनिवारी १६००, रविवारी १८५० आणि आज सोमवारी १५०१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवल्याने अवघ्या चार दिवसांत ७ हजार २८८ बाटल्या रक्त संकलन करण्यात यश आले. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोमवारी या महारक्तदान सप्ताहाला उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधला आणि या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने राज्य रक्त संक्रमण परिषद, ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, जे. जे. महानगर ब्लड बँक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या सहकार्याने ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुक्रवार, ८ ऑक्टोबर रोजी या महारक्तदान सप्ताहाचा शुभारंभ केला.
केवळ ठाणेच नव्हे तर डोंबिवली, कल्याण, बदलापूर, मीरा रोड, भाईंदर, पालघर, वसई, विरार, उल्हासनगर येथील रक्तदात्यांनीही सोमवारी ठाण्यात येऊन रक्तदान केले. स्वतः एकनाथ शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, लोकप्रिय अभिनेते कुशल बद्रिके यांनीही या महारक्तदान सप्ताहात रक्तदान केले असून राज्यभर जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. त्यामुळे रुग्णांचीही परवड होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलिकडेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यालाच अनुसरून यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला आणि त्यानुसार शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले. रक्तदान हे पुण्याचे काम आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते एकाच्या शरीरातून काढूनच दुसऱ्याला द्यावे लागते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील सुमारे ६५ ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्या आहेत.