कल्याण बस डेपोतून मुक्कामी जाणाऱ्या सात बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:36 AM2021-08-01T04:36:40+5:302021-08-01T04:36:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका कल्याण एसटी बस डेपोला बसला आहे. कोरोनाकाळात राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका कल्याण एसटी बस डेपोला बसला आहे. कोरोनाकाळात राज्यातील एसटीच्या सर्व डेपोतून प्रवासी वाहतूक बंद होती. खेडेगावांमध्ये मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद झाल्या. दरम्यान, सध्या या डेपोतून मुक्कामी जाणाऱ्या २३ पैकी सात बस अजूनही बंद आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बस पूर्ण प्रवासी क्षमतेनुसार धावत असल्या तरी ज्या गावी बस जाते तेथे जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनामुळे निर्बंध उठविले गेले नसल्यास तेथे प्रवासी घेऊन जाणे एसटी डेपोला जिकिरीचे काम वाटते. शिवाय निर्बंधांचे उल्लंघन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस डेपो प्रशासनाला या बाबी लक्षात घेऊन कोरोना नियमावलीचे पालन करीत प्रवासी वाहतूक करावी लागते. मुक्कामी जाणाऱ्या बसला त्याचा फटका बसला आहे. मुक्कामी जाणाऱ्या बस आता मुक्कामी ठेवल्या जात नाहीत. सकाळी पाठवून सायंकाळी परत डेपोत आणल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
--------------------------------------
९० टक्के बस मार्गावर मार्गस्थ
कल्याण बस डेपोतून ७० बस चालविल्या जातात. आता निर्बंध शिथिल असल्याने जास्तीत जास्त बस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळत आहे. सध्या रेल्वेतून सामान्य प्रवाशांना प्रवासाची बंदी असल्याने प्रवाशांना एसटीचा आधार आहे. त्यामुळे ९० टक्के बस रस्त्यावर मार्गस्थ केल्या जातात. केवळ १० टक्केच बस दुरुस्ती देखभालीचे कारण असल्यास कार्यशाळेत असतात. त्यामुळे कोणतीही बस उगाच आगारात उभी करून ठेवली जात नाही.
--------------------------------------
कल्याण बस डेपोतील एकूण बसची संख्या - ७०
कोरोनापूर्वी मुक्कामी जाणाऱ्या बसची संख्या -२३
कोरोनानंतर बंद केलेल्या मुक्कामी बसची संख्या - ७
कल्याण-अहमदनगर मार्गावरील बंद पडलेल्या बसची संख्या-५
कल्याण-लोणार-१
कल्याण-पंढरपूर-१
सुरू असलेल्या मुक्कामी बसची एकूण संख्या-१६
--------------------------------------
रुग्ण घटले, एसटी सुरू आहे
१. कल्याण-नगर मार्गावर मी प्रवास करतो. मात्र, मुक्कामी थांबणाऱ्या बसही सुरू केल्यास कल्याण मार्गावरील बसची संख्या वाढू शकते. रुग्ण घटले आहेत. त्यामुळे मुक्कामी बस सुरू करण्यास काहीच हरकत नाही. हा एसटीला उत्पन्न मिळवून देणारा मार्ग आहे.
- सुरेश दबके
२. मी काही कामानिमित्त कल्याण-पंढरपूर प्रवास करतो. कल्याण-पंढरपूर ही मुक्कामी गाडी आषाढीच्या आधीच बंद केली आहे. ही गाडी आता सुरू करण्यात यावी. डेपो व्यवस्थापनाने त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
- लक्ष्मण पाचंगे
-----------------------------------
निर्बंध शिथिल होताच बस सुरू
कल्याण डेपोतील मुक्कामी बस बंद झाल्याची संख्या कमी आहे. ज्या गाड्या मुक्कामी जात होत्या, त्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध अद्याप शिथिल केलेले नाहीत. डेपोतून जाणाऱ्या मुक्कामी गाड्या आता मुक्कामी ठेवल्या जात नाहीत, तर त्या पुन्हा सायंकाळी डेपोच्या दिशेने परत आणल्या जातात. जसे निर्बंध शिथिल होतील, त्यानुसार बंद पडलेल्या गाड्याही सुरू करण्यात येतील.
- विजय गायकवाड, व्यवस्थापक, कल्याण बस डेपो
---------------------------------------