सात अग्निशमन बुलेट दाखल
By admin | Published: October 5, 2016 02:18 AM2016-10-05T02:18:11+5:302016-10-05T02:18:11+5:30
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलात सात अत्याधुनिक फायरफायटींग बुलेट दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकनंतर वसई पालिकेने तब्बल ४७ लाख रुपये खर्चून बुलेट विकत घेतल्या आहेत.
वसई : वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलात सात अत्याधुनिक फायरफायटींग बुलेट दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकनंतर वसई पालिकेने तब्बल ४७ लाख रुपये खर्चून बुलेट विकत घेतल्या आहेत.
चौदा मजल्यापर्यंतची आग विझवण्यासाठीची सव्वा चार कोटी रुपयाची फायर गाडीही पालिकेच्या अग्निशमन दलाकडे आहे. शहर आणि ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यावर फायरची मोठी गाडी जाणे कठीण होते. तसेच गल्ली बोळातील घरातील शॉर्ट सर्कीटची आग असेल, गॅस स्फ़ोटावर नियंत्रण मिळवण्यासाठी या बुलेटचा फायदा होणार आहे. त्याकरीता बुलेटवर आग विझवण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर साप पकडण्यासाठी फायर बुलेटचा वापर होणार आहे. साप पकडण्यासाठी बुलेटवर कॅचेरची व्यवस्था असून जवान सुरक्षित राहून साप पकडू शकणार आहेत.
एका बुलेटची मूळ किंमत १ लाख ३ हजार १९२ इतकी आहे. या बुलेटवर अत्याधुनिक सामुग्री बसवल्यानंतर त्यांची किंमत ६ लाख ६८ हजार ९१२ रुपयांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे सात बुलेटवर पालिकेला ४७ लाख ३ हजार ३४४ रुपये खर्च आला आहे.
महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते बुलेट लोर्कापण करण्यात आल्या. यावेळी आयुक्त सतीश लोखंडे, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)