तब्बल सात तास मृतदेह रस्त्यावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:43 AM2018-05-29T01:43:51+5:302018-05-29T01:43:51+5:30
डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप राऊत (२२) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी नडगाव (खडवली) येथे घडली.
टिटवाळा : डम्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप राऊत (२२) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी नडगाव (खडवली) येथे घडली. मात्र, घटना घडूनही दोन तासांनंतर पोलीस घटनास्थळी आले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अखेर, जवळपास सात तासांनंतर नातेवाइक व जमावाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.
राऊत हा सकाळी ११ च्या सुमारास दुचाकीवरून फळेगाव-खडवली या रस्त्याने दानबावहून पडघा-आतकोली येथील घरी चालला होता. त्यावेळी नडगाव येथे एका भरधाव डम्परने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात राऊत खाली पडताच त्याच्या अंगावरून डम्पर गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्परचालकाने पलायन केले. दुसरीकडे त्याचे नातेवाइक घटनास्थळी दाखल झाले. घटना घडून दोन तास झाल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता. त्यामुळे संतप्त झालेले नातेवाइक व जमावाने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यास हरकत घेतली. त्यामुळे पोलिसांनी जादा कुमक मागवली. यावेळी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाची समजूत घातल्यानंतर डम्परचालक आणि मालक यांच्याविरोधात भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अखेर, सात तासांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पाेिलसांनी तो विच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, या अपघाताला महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाल्या.