जागतिक कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सात हौशी धावपटू होणार सहभागी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 2, 2024 04:28 PM2024-05-02T16:28:02+5:302024-05-02T16:31:18+5:30
अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सुप्रसिद्ध धावपटू डॉ. महेश बेडेकर यांच्यासह सात हौशी धावपटू सहभागी होत आहेत.
प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली जाणारी जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील सुप्रसिद्ध धावपटू डॉ. महेश बेडेकर यांच्यासह सात हौशी धावपटू सहभागी होत आहेत. डॉ. बेडेकर यांनी जगातील सहा मोठ्या मॅरेथॉन पूर्ण करुन जगभर ठाण्याचे नाव उंचावले होते. आता ते पुन्हा जागतिक स्तरावर हौशी धावपटू म्हणून सहभागी होत आहेत.
बर्लिन, न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, शिकागो आणि शेवटची बोस्टन या मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर ते न्यू बैंड येथील स्पर्धेत सहभागी झाले. त्यानंतर वॉशिंग्टन येथील नॉर्थ बैंड या शहरात घेण्यात येणाऱ्या लाईट ऑफ द टनल मॅरेथॉन या स्पर्धेत भारतातून डॉ. बेडेकर हे एकमेव स्पर्धक सहभागी झाले होते. ९ जून रोजी होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत त्यांच्यासह चिन्मय सेनगुप्ता, विवेक थिलकन, प्रशांत सिन्हा, रामनाथ मेंगल, विद्या राव, निखील चंदराणा हे धावपटू सहभागी होत आहेत.
या स्पर्धेत दरवर्षी ३२ हजार जगभरातून तर भारतातून ४५० धावपटू सहभागी होत असतात. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही अंदाजे ८८ ते ९० किलोमीटर ची अल्ट्रामॅरेथॉन आहे जी दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु-नताल प्रांतात दर वर्षी डर्बन आणि पीटरमॅरिट्झबर्ग शहरांदरम्यान चालवली जाते. ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अल्ट्रामॅरेथॉन शर्यत आहे. शर्यतीची दिशा दर वर्षी डरबनपासून सुरू होणारी "अप" धाव (८७.६ किमी) (उंची: १०१ मीटर (३३१ फूट)) आणि पीटरमॅरिट्झबर्गपासून सुरू होणारी "खाली" धाव (८७.७ किमी) दरम्यान बदलते. ९२१ मीटर (३,०२२ फूट)). दक्षिण आफ्रिकेतील धावपटू मैदानाचा मोठा भाग बनवतात, परंतू अनेक प्रवेशकर्ते युनायटेड किंगडम , झिम्बाब्वे , भारत , युनायटेड स्टेट्स , ब्राझील , ऑस्ट्रेलिया , बोत्सवाना , रशिया , इस्वातिनी आणि जपान येथून येतात.
डॉ. बेडेकर आणि त्यांचे इतर सह सहकारी लोणावाळा येथे फेब्रुवारीमध्ये ५० किमीचा, मार्चमध्ये ५४ किमीचा तर एप्रिलमध्ये कास येथे ६५ किमी अंतराचा सराव केला आहे तर १९ मे रोजी ५४ किमीचा सराव केला जाणार आहे. दर रविवारी ५ ते १० वेळा येऊरची चढाईकेली जाते तर दररोज १५ ते २० किमीचा सराव केला जात आहे. या वर्षी "अप" धाव मॅरेथॉन असून ती आव्हानात्मक असल्याचे डॉ. बेडेकर यांनी सांगितले.