सात हजार किलो भेसळयुक्त अन्नसाठा जप्त; १७२ नमुने घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:22 AM2019-11-01T00:22:49+5:302019-11-01T00:23:20+5:30
साठ्याची किंमत १३ लाख
ठाणे : सणासुदीच्या दिवसांत भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिम राबवून कोकण विभागात भेसळीच्या संशयावरून खवा-मावा, खाद्यतेल, तूप आणि मिठाई अशा अन्न पदार्थांचे एकूण सात हजार किलो वजनाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत १३ लाखांहून अधिक आहे. तसेच यावेळी, प्रशसानाने एकूण १७२ अन्न पदार्थांचे नुमने घेतल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासनाने दिली. तसेच भेसळ संदर्भात काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडल्या. तिच्या कामात व्यस्त असतानाही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळात-वेळ काढून सणासुदीच्या दिवसांत खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल व वनस्पती तूप व इतर अन्न पदार्थांचा सर्रास वापर केला जातो.
या अन्न पदार्थाच्या दर्जा व सुरक्षिततेविषयी अन्न व औषध प्रशासन जागरूक असल्यामुळे अन्न पदार्थाचा दर्जा व सुरक्षितता कायम राहिल. याबाबत दक्षतेचा उपाय म्हणून कोकण विभाग सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या निर्देशानुसार उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत सर्व स्तरावर विशेष मोहिम राबवण्यात आली.
या मोहिमेंतर्गत खवा-माव्याचे ८, खाद्यतेल,वनस्पती व घी याचे ३४, मिठाईचे ७२ आणि रवा-आटा, मैदा आणि बेसन इतर अन्न पदार्थाचे ५८ असे एकूण १७२ अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. तसेच भेसळीच्या संशयावरून खवा-माव्याचे ३२७ किलो वजनाचा ८० हजार ९०० रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.तसेच, खाद्यतेल,वनस्पती आणि घी याचा ४ हजार ३९५ किलो वजनाचा ४ लाख ६ हजार ५३५ रूपये किंमतीचा साठा, मिठाई १ हजार १३८ किलो वजनाचा २ लाख १८ हजार ७२० रुपये किंमतीचा साठा तर रवा, आटा,मैदा आणि बेसन इतर असा १ हजार ७१ किलो वजनाचा ६ लाख २२ हजार ३९० रुपये किंमतीचा असा एकूण १३ लाख २८ हजार ५४५ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.
१५ पथकांची मोहीम
या मोहिमेतंर्गत ३० अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांची १५ पथके तयार केली होती. तसेच अन्न पदार्थाच्या दर्जा व सुरक्षिततेविषयी अन्न व औषध प्रशासन जागरूक असून अन्न पदार्थाच्या भेसळीबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ किंवा ठाणे एफडीए कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.