रुणवाल गार्ड सिटीत परांची कोसळून सात कामगार जखमी, दोषींवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:05 PM2018-10-29T15:05:51+5:302018-10-29T15:07:38+5:30
रंगकामांसाठी बांधण्यात आलेली परांची कोसळून झालेल्या अपघातात सात कामगार जखमी झाले असून काहींना उपचारार्थ खाजगी तर काहींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाणे - लाकडाची परांची पडून ७ मजूर जखमी झाल्याची घटना बाळकूम परिसरातील रु णवाल गार्डन सिटी इमारतीच्या परिसरात घडली आहे. यामध्ये तीन मजूर गंभीर जखमी झाले असून पाच मजुरांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जवळपास दीड वर्षांपासून ही लाकडाची परांची बांधून ठेवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ती सोडताना ही घटना सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली आहे. दीड वर्षांपासून ही परांची काढली नसल्याने बांबू पूर्णपणे कमकुवत झाल्याने वर चढलेले मजूर सरळ खाली आले. यामध्ये ज्यांच्या निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेत मोह्हमद राखिबुलह शेख (३०), मोहम्मद रॉयल शेख (२१), जमाल शेष (५०), हसन अली (२४), इक्तीयार युसूफ मोहहम्द (२०), दुलाल सिंग (३२) आणि मनीरुद्दीन शेख (२७) अशी जखमींची नावे आहेत. बाळकूम परिसरातील रुणवाल गार्डन सिटीच्या ए ३ या १८ मजल्यांच्या इमारतीमध्ये ही लाकडांची परांची बांधण्यात आली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास परांची काढण्यासाठी काही मजूर या परांचीवर चढले होते. ही परांची काढण्यात सोडत असतांना हे सर्व मजूर परांचीसकट खाली पडले. यामध्ये सर्वच मजूर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनची टीम काही वेळातच घटनास्थळी पोचले. रुग्णवाहिका उशिरा आल्याने सुरवातीला पाच मजुरांना रिक्षाने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाऊण तासानंतर पाच मजूर हायलँडला दाखल केले असून दोन जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा उघड होईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दीड वर्षांपूर्वी कलरचे काम करण्यासाठी ही परांची बांधली होती. दादा कुंभार म्हणून कंत्राटदार असून संपूर्ण घटनेचा तपास चालू आहे. (प्रकाश निलेवाड - सहाय्यक पोलीस आयुक्त)