तरुणाला सात वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:17 AM2023-03-29T07:17:25+5:302023-03-29T07:17:53+5:30
याच खटल्याची सुनावणी २८ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली.
ठाणे : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दक्ष उर्फ डॅनियल सुज्ञान आव्हाड (२०) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास, तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी मंगळवारी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.
नवी मुंबईतील वाशी परिसरात ही १४ वर्षीय मुलगी १९ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास तिचा मित्र दक्ष याच्यासमवेत गार्डनमध्ये फिरायला गेली. त्यानंतर त्याने तिला फूस लावून पळवून नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने आरोपी दक्षला अटक केली होती.
याच खटल्याची सुनावणी २८ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली. यावेळी नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर करून पीडितेची जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जगताप आणि हवालदार लहाने यांनी काम पाहिले.